किल्लेमच्छिंद्रगड येथे गॅस्ट्रो, काविळीने दोघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:12+5:302021-03-31T04:26:12+5:30
शिरटे : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे दूषित पाण्याने दोन नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका ८० वर्षाच्या वृद्धाचा गॅस्ट्रोने, ...

किल्लेमच्छिंद्रगड येथे गॅस्ट्रो, काविळीने दोघांचा बळी
शिरटे : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे दूषित पाण्याने दोन नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये एका ८० वर्षाच्या वृद्धाचा गॅस्ट्रोने, तर ३० वर्षीय तरुणाचा काविळीने मृत्यू झाला आहे. एकाचदिवशी दूषित पाण्याचे दोन बळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गावचे शेतकरी अधिक उत्पन्नासाठी शेतीत खत म्हणून मळी तसेच मळीमिश्रित पाण्याचा वापर करतात. मळीतील अर्क आणि मळीमिश्रित दूषित सांडपाणी पिकासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यासोबत जमिनीत जिरल्याने सपकाळ खोरी, सय्यद-आगा मळा, कणसे मळा परिसरातील सर्व विहीर, बोअरचे पाणी खराब झाले आहे. पाण्याला तांबूस रंग आला आहे. पाण्याची दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे बंद झाले आहे. प्रदूषित पाणी पिण्याने गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेली अनेक वर्षे गावास स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना, शासन स्तरावर कोणतीच दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोट
गावालगतच्या भूगर्भातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. प्रदूषण विभागाकडे तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. वेळीच दखल घेऊन प्रदूषण रोखले असते, तर दोन नागरिकांचे हकनाक बळी गेले नसते.
राहुल निकम,
उपसरपंच, ग्रामपंचायत, किल्लेमच्छिंद्रगड