तरुणाला पेट्रोल ओतून पेटविले

By Admin | Updated: May 29, 2015 23:56 IST2015-05-29T23:41:08+5:302015-05-29T23:56:38+5:30

सांगलीतील घटना : तिघांना अटक; खुनाच्या कटाची माहिती दिल्याने कृत्य

The gas was fueled by the youth | तरुणाला पेट्रोल ओतून पेटविले

तरुणाला पेट्रोल ओतून पेटविले

सांगली : खुनासह गंभीर गुन्हे दाखल असलेला सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टीतील गुंड आश्पाक शेख याच्या खुनाचा कट उघडकीस आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, खुनाचा कट रचला होता, अशी माहिती आश्पाकला का दिलीस, या कारणावरुन संशयितांनी आश्पाकचा चुलत भाऊ शाहरूख रफीक शेख (वय १६, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) यास पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. २४ मे रोजी हा प्रकार घडला आहे. मात्र शाहरुखने शुक्रवारी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.सचिन शंकर नलवडे (२३) व महेश जालिंदर माळी (२३, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांविरुद्धही गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याने शाहरुख भाजून जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आश्पाक शेख व संशयितांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा वाद वाढत गेला. यातून त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. शाहरुख संशयितांना सातत्याने रागाने पाहायचा. त्यामुळे त्यांनी त्याची ‘गेम’ करण्याचा बेत आखला होता. हा प्रकार शाहरुखला समजला. त्याने आश्पाकला याची माहिती दिली. यामुळे त्याला राग आला. त्याने संशयितांची भेट घेऊन याचा जाब विचारला. त्यावेळीही त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर संशयितांनी २४ मे रोजी धामणी रस्त्यावर शाहरुखची भेट घेतली. ‘तू आश्पाकला आम्ही त्याचा खून करणार असल्याचे का सांगितलेस’, अशी विचारणा करून, त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. यामध्ये तो भाजून जखमी झाला. शासकीय रुग्णालयात तो उपचार घेत आहे.
पोलिसांना त्याने गरम पाणी अंगावर पडल्याने भाजले असल्याचे सांगितले. मात्र दोन दिवसांपूर्वी संशयितांनी शाहरुखची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व ‘सहा महिन्यात तू सांगली सोडून जा, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी त्यांनी धमकी दिली. यामुळे शाहरुखने शुक्रवारी संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)


आश्पाक पुन्हा चर्चेत
आश्पाक शेख हा शंभरफुटी रस्त्यावरील एका टोळीशी संबंधित होता. ८ डिसेंबर २००८ रोजी गुंड अकबर आत्तारचा खून करण्यात आला होता. त्यावेळी आश्पाकसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यातून सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. मध्यंतरी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आता त्याच्या खुनाचा कट उघडकीस आल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे. संशयितांनी खुनाचा कट रचण्याचे कारण काय होते, याचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The gas was fueled by the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.