गॅस महागल्याने उज्ज्वलांच्या घरांत पुन्हा चुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:36+5:302021-02-23T04:41:36+5:30
सांगली : धूरमुक्त स्वयंपाकघर आणि महिलांच्या आरोग्याची जपणूक या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविली; पण सिलिंडरच्या ...

गॅस महागल्याने उज्ज्वलांच्या घरांत पुन्हा चुली
सांगली : धूरमुक्त स्वयंपाकघर आणि महिलांच्या आरोग्याची जपणूक या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविली; पण सिलिंडरच्या अव्वाच्या सव्वा किमतींमुळे उज्ज्वला लाभार्थींच्या घरांत पुन्हा एकदा चुली पेटू लागल्या आहेत. महागडा सिलिंडर घेणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरत आहे.
गेल्यावर्षीच्या मे महिन्यात सिलिंडरचे अनुदान संपुष्टात आणले गेले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ होत राहिली. सुरुवातीला दोन-पाच रुपयांची दरवाढ नंतर १५-२० रुपयांपर्यंत पोहोचली. पंधरवड्यापूर्वी तर थेट ५० रुपयांची दरवाढ झाली. उज्ज्वलाच्या लाभार्थींसाठी ती असह्य ठरली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी या योजनेतून मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या होत्या. आता दरवाढ करताना या कुटुंबांना गृहीतच धरण्यात आलेले नाही. योजनेच्या सुरुवातीलादेखील पहिला विनाशुल्क सिलिंडर रिकामा झाल्यानंतर नव्याने भरून घेण्यासाठी उज्ज्वला लाभार्थी आले नाहीत असे आढळले होते. त्यावेळी सिलिंडरच्या किमती ४०० रुपयांच्या घरात होत्या, तरीही तो परवडणारा ठरला नव्हता. आता तर तो ८०० रुपयांवर गेला आहे.
लॉकडाऊन काळात रोजगार गेल्याने उज्ज्वला लाभार्थींना सरकारने एप्रिल, मे व जून महिन्यांत मोफत सिलिंडर दिले, आता ८०० रुपये देऊन विकत घ्यावा लागत आहे. या स्थितीत उज्ज्वला लाभार्थींच्या घरात रिकामा सिलिंडर कोपऱ्यात ठेवून पुन्हा चुली पेटवण्यात येत असल्याचे आढळले आहे.
चौकट
सिलिंडरसाठी ८०० रुपये आणायचे कोठून?
- महिन्याला जेमतेम तीन-साडेतीन हजाराची मिळकत असणाऱ्या कुटुंबात सिलिंडरसाठी ८०० रुपये आणायचे कोठून, असा प्रश्न आहे. गॅस आल्यानंतर या महिलांनी सरपणाला फाटा दिला होता, चुली बाजूला काढून ठेवल्या होत्या. आता त्या पुन्हा जवळ कराव्या लागताहेत.
- रिक्षा किंवा अन्य वाहनांसाठी सिलिंडर देण्याचे प्रमाणही वाढले आहे. सिलिंडर भरून आणणे परवडत नसल्याने रिकामा सिलिंडर रिक्षाचालकांना वापरायला दिला जात आहे. गॅस भरून तो रिक्षा वाहतुकीसाठी अवैधरीत्या वापरला जात आहे.
- पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी- १,२१,०००
घरगुती गॅस सिलिंडरच्या दराचा आढावा
जानेवारी २०२० - ७०३.५०
जुलै २०२० - ६०९
जानेवारी २०२१ - ७१०.५०
फेब्रुवारी २०२१ - ७८५.५०
कोट
एजन्सीमध्ये सिलिंडर भरण्यासाठी गेले असता ८०० रुपये किंमत झाल्याचे समजले. इतके पैसे सोबत नेले नसल्याने टाकी परत आणली. आता पैसे शिल्लक राहतील तेव्हा गॅस भरून आणेन. सध्या लाकडावर चूल सुरू केली आहे.
- वहिदा जातगार, मिरज
कोट
शेतात राहत असल्याने लाकुडफाटा भरपूर आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी पैसे खर्च करत नाही. किंमत कमी असताना गॅस भरून आणला होता, तीन महिन्यांपासून घेतला नाही.
- शोभा दुर्गाडे, कर्नाळ
कोट
एकदा सिलिंडर भरला की तीन-चार महिने पुरतो. लॉकडाऊनमध्ये तीन सिलिंडर मोफत मिळाले होते, तेच अजून वापरत आहे. दर वाढल्याने नवा घेतला नाही. सध्याचा संपल्यावर पाहू.
- सरस्वती कांबळे, सांगली
कोट
दर वाढल्याने गॅस फक्त चहा व भाजी गरम करण्यासाठी वापरते. इतर स्वयंपाकासाठी लोखंडी शेगडी वापरते. कामावरून परततानाच जळण गोळा करते, त्यामुळे गॅससाठी पैसे खर्च होत नाहीत.
- रेखा कोट्टगिरी, सांगली
कोट
फुकट गॅसच्या नावाने सरकारने फसविले. आता दर वाढवून ठेवल्यामुळे गॅसचा वापर बंद करावा लागत आहे. घरात तीनच माणसे असल्यानेही गॅसचा वापर फार करावा लागत नाही. चुलीने धूर होतो; पण इलाज नाही.
- वैजयंता कोरे, सांगली