प्लास्टिकमुळे कणगी, टोपली इतिहास जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:32+5:302021-06-10T04:18:32+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : प्लास्टिकच्या आक्रमणामुळे अनेक पारंपरिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये कणगी व ...

प्लास्टिकमुळे कणगी, टोपली इतिहास जमा
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : प्लास्टिकच्या आक्रमणामुळे अनेक पारंपरिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये कणगी व बुरुड समाजाला आपला पारंपरिक व्यवसाय सोडावा लागत आहे. पूर्वी बांबूपासून बनवलेली कणगी, टोपली, छोट्या-मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. पण आधुनिक युगात पत्र्याचे, प्लास्टिकचे ड्रम वापरले जात आहेत. त्यामुळे कणगी बनवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
काही वर्षांपूर्वी कणगी समाज राहुटी करून गावाबाहेर राहायचे आणि आपला व्यवसाय करायचे. सध्या तालुक्यात कणगी समाज नाही. मात्र, बुरुड समाज शिराळा, आरळा, कोकरूड, सांगाव, शिरशी अशा काही ठिकाणी आजही मोठमोठी टोपली वळून आपला व्यावसाय जोपासत आहे. कणगी, टोपली तयार करुन आपला उदरनिर्वाह करणारे वृध्द आजही पाहायला मिळतात. पण तरुण मात्र या व्यवसायासाठी इच्छुक नाहीत. या ग्रामीण कारागिरांना आज शासनाच्या मदतीची आवश्यकता असून, त्यांना शासनाने पेन्शन चालू करावी, अशी मागणी होत आहे.
शिराळा तालुक्यात डोंगरदऱ्यातील वाडी-वस्तीवर टोपली वळणारे कारागीर मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी भरीव बांबूची बेटे भरपूर प्रमाणात असल्याने कणगी, टोपली वळण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होत असते. आज बहुतेक कारागिरांचे वय साठच्या पुढे गेले आहे. वृद्धापकाळातच या कारागिरांचे जगणे मुश्कील झाले आहे.
पूर्वी शेळीची कोकरं ठेवण्यासाठी डाली, जनावरांच्या शेणासाठी पाटी व लहान-मोठ्या टोपली, कणगी, तट्टा, मुडी आदींना मोठ्या प्रमाणात मागणी असायची. तसेच बांबूच्या वस्तू व करजांच्या फोकापासून वस्तू बनविणे हे कौशल्याचे काम होते. संपूर्ण जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिह्यातूनही शेतकरी या वस्तूंसाठी मागेल ती किंमत द्यायचे. त्यामुळे भरपूर कामे मिळायची, पण आज बदलत्या काळात या वस्तू वापरणं कमी झाल्याने या कारागिरांना उदरनिर्वाहासाठी अन्य कामे शोधावी लागत आहेत.