Ganpati Festival सांगली : एरंडोलीत साकारला २० फुटी रायगड-: एकता गणेशोत्सव मंडळाने हुबेहूब बनविली प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:05 IST2018-09-18T15:55:44+5:302018-09-18T16:05:34+5:30
पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवरील सजीव व मूर्ती देखाव्यांच्या गर्दीत यंदा एरंडोलीच्या एकता गणेशोत्सव मंडळाने किल्ले रायगडाची तब्बल २० फूट लांब, १८ फुटी रुंद आणि साडे सात फूट उंच असलेली प्रतिकृती साकारली.

Ganpati Festival सांगली : एरंडोलीत साकारला २० फुटी रायगड-: एकता गणेशोत्सव मंडळाने हुबेहूब बनविली प्रतिकृती
सांगली : पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवरील सजीव व मूर्ती देखाव्यांच्या गर्दीत यंदा एरंडोलीच्या एकता गणेशोत्सव मंडळाने किल्ले रायगडाची तब्बल २० फूट लांब, १८ फुटी रुंद आणि साडे सात फूट उंच असलेली प्रतिकृती साकारली. संपूर्ण काळ््या दगडात आणि मातीच्या डोंगरासारखा डोंगर उभारून अत्यंत कल्पकतेने, सुबकतेने व कोरीव पद्धतीने हा किल्ला साकारला आहे.
मिरज तालुक्यातील अनेक गावांमधून नागरिक हा लक्षवेधी ठरलेला किल्ला पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. १६७४ मध्ये ज्यावेळी शिवराज्याभिषेक झाला, त्यावेळी रायगडाची जशी रचना असेल तशीच रचना साकारण्यात आली आहे. सांगलीतील शिवदुर्ग रचना यांनी हा किल्ला उभारण्यास तांत्रिक सहकार्य केले आहे. गुरव गल्लीतील एकता चौकात किल्ला प्रतिकृती उभारली आहे. येथे किल्ले संवर्धनासाठी निधी संकलनाचे कामही हाती घेण्यात आले आहे.
संपूर्णपणे काळ्या दगडात किल्ला उभारणी केली आहे. बालेकिल्ला, तटबंदी, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, वाघ दरवाजा, महाव्दार, शिवमंदिर, भवानी टोक, टकमक टोक, तलाव अतिशय कोरीव पद्धतीने साकारले आहेत. ते पाहण्यासाठी शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणांनी गर्दी केली आहे. त्यांना किल्ल्याची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. हा किल्ला अनंत चतुर्दशीपर्यंत खुला राहणार असल्याचे अध्यक्ष रमाकांत सुतार यांनी सांगितले.
ते म्हणाले, अन्य देखावे करून केवळ मनोरंजन करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या किल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास थेट लोकांसमोर नेण्याच्या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न केला आहे. यातून उभारलेला निधी गड संवर्धनकामी देण्यात येईल. शिवाय मंडळाचे सर्व सभासद एक दिवस गडावर श्रमदानही करणार आहेत. शिवदुर्ग रचनाचे सुनील रजपूत, श्रीरंग पटवर्धन, प्रणव रावळ, अमर जाधव, महेश नागणे, मारुती हुलवा या टीमने किल्ला उभारणीची तांत्रिक जबाबदारी पेलली.