गुंड म्हमद्याच्या साथीदाराला अटक
By Admin | Updated: November 30, 2015 01:17 IST2015-11-29T23:52:03+5:302015-11-30T01:17:20+5:30
कसून चौकशी : वसीम खानच्या कोठडीत वाढ; म्हमद्याचा शोध सुरुच

गुंड म्हमद्याच्या साथीदाराला अटक
सांगली : आर्थिक वाद व खंडणीचा दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा खून करणारा गुंड म्हमद्या नदाफचा साथीदार जुबेर मुस्ताक मुजावर (वय २१, रा. शंभरफुटी रस्ता, सांगली) यास रविवारी संजयनगर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, अटकेत असलेल्या वसीम खान याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसाची वाढ केली आहे.म्हमद्या नदाफ व मनोज माने हे दोघे जीवलग मित्र होते. म्हमद्या कारागृहात असताना मनोजने त्याच्या नावावर पैसे गोळा केले होते, असा संशय म्हमद्याला होता. म्हमद्या कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने अभयनगरमध्ये बर्वे शाळेसमोर घराचे बांधकाम काढले होते. यासाठी त्याला दोन लाख रुपये हवे होते. त्याने मनोजकडे पैशाची मागणी केली होती. पण त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघे एकमेकांशी बोलायचे बंद झाले. यातून त्यांनी त्यांच्या मित्रांकडे एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. खुनापूर्वी दोन महिने अगोदर म्हमद्याच्या साथीदारांनी मनोजचा मित्र भरत फोंडे याचे अपहरण करून त्याला ‘तुझा मित्र मनोजला म्हमद्याचे दोन लाख रुपये देण्यास सांग’, असे म्हणून मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी मनोजचेही अपरहण केले होते. याप्रकरणी फोंडेने म्हमद्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी मनोजला सरकारी साक्षीदार केले होते. हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी म्हमद्याने मनोजला धमकाविणे सुरु केले होते. यातून त्याने त्याचे अपहरण करून खून केला होता.म्हमद्याविरुद्ध तीन खुनांसह तब्बल १९ गंभीर गुन्हे नोंद आहेत. खुनानंतर तो रातोरात गायब झाला. त्याचा शोध सुरू असला तरी, अद्याप सापडला नाही. त्याला मदत करणाऱ्या नऊजणांच्या पोलिसांनी नाड्या आवळल्या आहेत. तरीही म्हमद्या अजून मदतीसाठी सांगलीत फिरत आहे. गेल्या आठवड्यात तो शंभरफुटी रस्त्यावरील चिरमुरे व्यापाऱ्याकडे पैसे मागण्यास गेला होता. पण हा व्यापारी घरी नव्हता. त्यामुळे म्हमद्या निघून गेला. व्यापाऱ्यासह त्याच्या मेहुण्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी करुन त्यांना सोडून दिले. दरम्यान, शनिवारी ताब्यात घेतलेल्या जुबेर मुजावर यास म्हमद्याला मदत केल्याचा ठपका ठेवून अटक केली आहे.
जुबरने त्याचा मित्र कलीम मुन्शी याची दुचाकी वापरायला घेतली. पण जुबेरने ही दुचाकी म्हमद्याला पळून जाण्यासाठी मदत म्हणून दिली होती. त्यामुळे त्यास अटक केली आहे. त्याला सोमवारी दुपारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांना प्रतीक्षा : म्हमद्या शरण येणार?
मनोजचा खून होऊन वीस दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही म्हमद्याला पकडण्यात यश आले नाही. त्याच्या शोधासाठी शंभरहून पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. शहरातील प्रमुख चौक व उपनगरांमध्ये नाकाबंदी व कोम्बिंग आॅपरेशन मोहीम राबविली. म्हमद्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर तो शरण येईल, अशी अपेक्षा होती. पण तसे घडले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. येत्या महिन्या अखेरीपर्यंत तो शरण न आल्यास न्यायालयामार्फत त्यास फरारी घोषित करून मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खान पुन्हा अडकला
वासीम खान यास यापूर्वीही म्हमद्याने केलेल्या गुन्ह्यात अटक केली आहे. आताही त्याला म्हमद्याला हत्यार पुरविल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्या पोलीस कोठडीत रविवारी वाढ केल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू ठेवली आहे.