गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्के वाढ
By Admin | Updated: September 16, 2015 12:09 IST2015-09-16T00:10:15+5:302015-09-16T12:09:41+5:30
मूर्तींची संख्या वाढली : शाडूच्या मूर्तींचे आठ दिवसांपूर्वीच बुकिंग फुल्ल

गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्के वाढ
सांगली : विविध आकारातील, विविध रूपातील गणेशमूर्तींची सांगलीच्या बाजारपेठेत गर्दी झाली असली तरी, यंदा मूर्तींचे दर गतवर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्के वाढले आहेत. त्यामुळे भाविकांकडून छोट्या आकारातील मूर्तींना मागणी वाढल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. दुसरीकडे पर्यावरणपूरक मूर्तींबाबत झालेल्या जागृतीमुळे बाजारातील शाडूच्या गणेशमूर्तींचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
सांगलीच्या बाजारपेठांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचे स्टॉल सजले आहेत. मारुती रोड, हरभट रोड, शिवाजी मंडई परिसर, गावभाग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्टॉल लागले आहेत. घरगुती गणेशमूर्तींना यंदा महागाईची झळ पोहोचली आहे. प्लॅस्टर व रंगाच्या दरामध्ये वाढ होण्याबरोबरच वाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे या दरवाढीचा मूर्तींच्या किमतीवर परिणाम झाला आहे. बाजारात सध्या १५० पासून ३ हजार रुपयांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्के दरवाढ झाल्यामुळे भाविकांनी मोठ्या मूर्तींपेक्षा छोट्या मूर्ती खरेदी करण्याला पसंती दिली आहे. बाजारात उत्साह दिसून येत असला, तरी यंदा सांगलीच्या बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर मूर्ती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत बुकिंगमध्ये घट झाल्याचे दिसून येते. तरीही बहुतांश विक्रेत्यांकडे ५० टक्के मूर्तींचे बुकिंग झाले आहे.
सांगलीसह कोल्हापूर, इचलकरंजी, मुंबई, पुणे या ठिकाणांहून मूर्ती आल्या आहेत. मूर्ती विक्रीच्या स्टॉलच्या संख्येतही वाढ झाली आहे.
‘जय मल्हार’चा प्रभाव
गणेशमूर्तींवर यंदा ‘जय मल्हार’ या टीव्ही मालिकेचा सर्वाधिक प्रभाव पडला आहे. मल्हार रूपातील गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणावर सांगलीत दाखल झाल्या आहेत. भाविकांनीही त्याचपद्धतीच्या मूर्तींना सर्वाधिक पसंती दिली आहे. मल्हार रूपातील मूर्तींबरोबरच लालबागच्या राजालाही भाविकांची मागणी आहे. प्रभावळ, दगडूशेठ मूर्तींनाही मागणी आहे.
निसर्गपूरक मूर्ती म्हणून शाडूच्या मूर्तींना यंदा मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक संघटनांनी याबाबत मोठी जागृती केल्यामुळे शाडूच्या मूर्ती खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. मागणीच्या तुलनेत शाडूच्या मूर्तींची संख्या कमी असल्यामुळे उत्सवाच्या चार दिवस अगोदरच या मूर्तींचे बुकिंग फुल्ल झाले आहे. शाडूच्या मूर्तीचे दर प्लॅस्टरच्या मूर्तींपेक्षा अधिक आहेत. २५० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत मूर्तींचे दर आहेत. (प्रतिनिधी)