गॅस, इंधन, वीज दरवाढीविरोधात गांधीगिरी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST2021-03-13T04:47:42+5:302021-03-13T04:47:42+5:30
सांगली : गॅस, पेट्रोल, डिझेल व वीज दरवाढीबद्दल सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी ...

गॅस, इंधन, वीज दरवाढीविरोधात गांधीगिरी आंदोलन
सांगली : गॅस, पेट्रोल, डिझेल व वीज दरवाढीबद्दल सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंचचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी केले आहे.
साखळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जोपर्यंत सामान्य माणूस पेटून उठणार नाही, तोपर्यंत वाढत्या महागाईबद्दलचा सामान्यांचा संताप केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचणार नाही. सामाजिक संघटना व काही राजकीय पक्ष साेडले, तर सामान्य माणूस घरात बसून मनातल्या मनात विरोध करत बसतो. तो रस्त्यावर येत नाही, त्याचा गैरफायदा राज्यकर्ते घेतात. ते कोणत्याही पक्षाचे असले तरी ते दुर्लक्ष करतात.
पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने उच्चांक स्थापन केल्याबद्दल पेट्रोलपंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहिरात फलकास पुष्पगुच्छ अर्पण करून अभिनंदन करणार आहोत. ज्याला शक्य आहे, त्या सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन पुष्पगुच्छ अर्पण करावे.
तसेच वाढीव व अन्यायकारक वीजबिलाबाबत महावितरण कार्यालयाच्या गेटवर व वीजपुरवठा तोडण्यासाठी येणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात मोठे डिजिटल फलक तयार करून नागरिकांच्या सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन साखळकर यांनी केले आहे.