मिरजेत शिवाजी क्रीडांगणाचा खेळखंडोबा
By Admin | Updated: September 13, 2015 00:18 IST2015-09-13T00:14:57+5:302015-09-13T00:18:31+5:30
वर्षाआधीच होते बुकिंग : मैदानाच्या वापरावरून सुरू आहेत राजकीय कुरघोड्या...

मिरजेत शिवाजी क्रीडांगणाचा खेळखंडोबा
सदानंद औंधे ल्ल मिरज
महापालिकेच्या मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा खेळखंडोबा सुरू असून, मैदानाच्या आरक्षणासाठी एक वर्ष आधी भाडे भरून घेण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात जयंत चषक फुटबॉल स्पर्धेसाठी गतवर्षी मैदानाचे भाडे भरून घेण्यात आल्याची माहिती अधिकाराखाली स्पष्ट झाली आहे. मैदानाची रंगरंगोटी व दुरुस्तीसाठी साडेचार लाख रुपये खर्च कागदोपत्री दाखविण्यात आल्याची तक्रार आहे.
मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगण महापालिकेचे एकमेव मैदान आहे. या मोठ्या मैदानावर फुटबॉल व क्रिकेट स्पर्धा सुरू असतात. विविध पक्ष, संघटनांतर्फे नेत्यांच्या वाढदिवसासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मैदानाच्या वापरासाठी महापालिकेकडून भाडे आकारण्यात येते. मात्र मैदानाच्या वापरासाठी राजकीय कुरघोड्या सुरू असून, विरोधकांना मैदान मिळू नये यासाठी वर्षभर आधी भाडे भरून मैदान आरक्षित करून ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत.
यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या जयंत चषक फुटबॉल स्पर्धेसाठी मैदान कधी आरक्षित करण्यात आले, याची माहिती विचारल्यानंतर स्पर्धेसाठी गतवर्षीच्या जानेवारीत मैदानाचे भाडे भरण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मैैदानाच्या आरक्षणासाठी नियमांची विचारणा केली असता, असे कोणते नियमच नसल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. मैदानाची दुरूस्ती, रंगरंगोटी, माती टाकण्यासाठी साडेचार लाख रुपये खर्चाचे काम ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. मात्र कोणतीही दुरुस्ती व रंगरंगोटी न करता बिल काढण्यात आल्याची तक्रार विकास कुलकर्णी यांनी केली आहे. तक्रारीनंतर ठेकेदाराचे बिल थांबविण्यात आले आहे. मात्र मैदानाच्या दुरुस्तीसाठी कागदोपत्री खर्च करण्यात येत आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शिवाजी क्रीडांगणाची दुरवस्था झाली असून, मैदानावरील दिवे बंद आहेत. रात्रीच्या अंधारात व्यसनी, जुगारी, गुन्हेगारांचा येथे वावर आहे. मैदानाची दुरुस्ती व सुविधांच्या मागणीसाठी खेळाडूंनी आंदोलने केली आहेत.