स्थायी सभापती निवड लांबणीवर टाकण्याची खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:31+5:302021-09-06T04:30:31+5:30
महापालिकेच्या स्थायी सभापती निवडीत चुरस निर्माण झाली आहे. समितीत भाजपचे बहुमत आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे ७ सदस्य आहेत. बहुमतासाठी दोन ...

स्थायी सभापती निवड लांबणीवर टाकण्याची खेळी
महापालिकेच्या स्थायी सभापती निवडीत चुरस निर्माण झाली आहे. समितीत भाजपचे बहुमत आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे ७ सदस्य आहेत. बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजप नगरसेवकांशी संपर्क करण्यात येत होता. याची कुणकुण लागताच भाजपने नऊ सदस्यांना हैदराबादला रवाना केले. त्यामुळे फोडाफोडीच्या प्रयत्नाला ब्रेक लागला असला तरी काँग्रेसने अद्याप आशा सोडलेली नाही.
त्यात आता या निवडीच लांबणीवर टाकण्याची खेळी खेळण्यात येत आहे. काँग्रेसने निवडीचा कार्यक्रमच बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी नगरसचिव कार्यालयाकडून निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. शनिवारी सदस्यांना नोटिसा देण्यात आल्या. त्या बेकायदा असल्याचे सांगत याविरोधात महसूलमंत्री, पालकमंत्री व विभागीय आयुक्ताकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्य शासनाकडून निवडीला स्थगिती आणण्याचा डावपेचही आखला आहे. त्याला कितपत यश येते, यावर निवडीचे भवितव्य अवलंबून आहे.
चौकट
नाराजावर भिस्त
भाजपमध्ये सभापतिपदाच्या उमेदवारीवरून फाटाफूट होईल, अशी अटकळ बांधत काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपच्या नाराजांवर काँग्रेसची भिस्त आहे. दुसरीकडे सर्व सदस्यांना एकत्र ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. फाटाफूट होऊ नये, यासाठी राज्यस्तरावरील नेत्यांची मदत घेतली जात आहे.