गेल ऑम्वेट यांचे कार्य जगातील सर्वच युवा वर्गाने अभ्यासावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:05+5:302021-09-02T04:56:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट, एक विद्वान कार्यकर्त्या आणि अभ्यासक होत्या. फुले-आंबेडकर-मार्क्स विचारांची जगाला नव्याने ...

गेल ऑम्वेट यांचे कार्य जगातील सर्वच युवा वर्गाने अभ्यासावे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट, एक विद्वान कार्यकर्त्या आणि अभ्यासक होत्या. फुले-आंबेडकर-मार्क्स विचारांची जगाला नव्याने ओळख करून देणारे व्यक्तिमत्त्व होते. शोषित, वंचित, पीडितांचा एक बुलंद आवाज थांबला आहे, असे मत पुरोगामी संघटनांतर्फे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. विजयकुमार जोखे यांनी व्यक्त केले.
शिराळा येथील संत गाडगे महाराज सभागृहात समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत प्रा. जोखे बोलत होते.
प्रा. जोखे म्हणाले की, व्हिएतनाम युद्धानंतर जगाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आल्या आणि महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, चळवळींचा अभ्यास करताना त्या इथल्या चळवळींत एकरूप होऊन गेल्या की त्या याच देशाच्या नागरिक झाल्या. कॉम्रेड गेल यांचे निधन झाल्यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात एक भावनिक पोकळी निर्माण झाली आहे. गेल यांच्या साहित्याची संशोधन, मांडणी समजून घेणे गरजेचे आहे.
सुधीर दाभाडे म्हणाले, डॉ. गेल यांची इंग्रजीतील पुस्तकांचे मराठी भाषेत प्रकाशित करण्यासाठी सर्व पुरोगामी युवकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जेणेकरून कॉम्रेड गेल यांचे सबंध साहित्यविचार हे महाराष्ट्रातील सर्वच तळागाळापर्यंत पोचतील, हीच त्यांना आदरांजली ठरेल.
यावेळी बाबासो कांबळे, सचिन पाटील, पोपट बनसोडे, मारुती रोकडे, गोरक्ष घेवदे, सुभाष कदम आदी उपस्थित होते.