गेल ऑम्वेटांनी खेड्यामध्ये स्त्रीवादी चळवळ घट्ट रुजविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:49+5:302021-09-04T04:31:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : डॉ. गेल ऑम्वेट यांचा स्त्रीवादी चळवळीत १९७५ पूर्वीपासूनच महत्त्वाचा सहभाग होता. शहरापेक्षा खेड्यात स्त्रीवादी ...

गेल ऑम्वेटांनी खेड्यामध्ये स्त्रीवादी चळवळ घट्ट रुजविली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : डॉ. गेल ऑम्वेट यांचा स्त्रीवादी चळवळीत १९७५ पूर्वीपासूनच महत्त्वाचा सहभाग होता. शहरापेक्षा खेड्यात स्त्रीवादी चळवळ अधिक घट्ट रुजलेली असल्याचे त्यांचे निरीक्षण होते. स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्रियांनीच आवाज उठवला पाहिजे, या भावनेने त्यांनी ग्रामीण भागामध्ये कार्य केले, असे मत महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड गीता ठक्कर यांनी व्यक्त केले.
सांगली निवारा भवन येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट यांना भावपूर्ण आदरांजली सभा झाली. यावेळी गीता ठक्कर बोलत होत्या. प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉम्रेड शंकर पुजारी म्हणाले की, महाराष्ट्राच्या श्रमिक मुक्ती चळवळीतील एक वैचारिक व परखड आवाज म्हणजे गेल ऑम्वेट होत्या. त्या समाजशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक आणि स्त्रीवादी चळवळीत सतत कार्यरत राहिल्या.
श्रमिक मुक्ती दलाचे नेते ॲड. कृष्णा पाटील म्हणाले की, डॉ. गेल यांनी लिहिलेल्या ३१ पुस्तकांमधून आर्थिक, परंपरावादी, जातीय, धार्मिक, सामाजिक विषयांवर प्रहार केला आहे. हिंदू धर्माच्या धार्मिक शास्त्रावर टीका केली आहे. विविध जातींमध्ये एकता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले वैचारिक योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रा. अमित थक्कर म्हणाले की, डॉ. गेल ऑम्वेट यांची बहुतांश पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत. ती सर्व पुस्तके महत्त्वाची असल्यामुळे, त्याचे मराठी भाषांतर करून ती पुस्तके सर्वसामान्य जनतेपर्यंत नेली पाहिजेत.
या स्मरण सभेमध्ये कॉ. सुमन पुजारी, शहाजी गडहिरे, कॉ. गोपाळ पाटील, साथी शिवाजी त्रिमुखे, कॉ. विजय बचाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
चौकट
खेडेगावात स्वत:ला सामावून घेतले : बाबूराव गुरव
डॉ. बाबूराव गुरव म्हणाले की, गेल ऑम्वेट यांनी अमेरिकेतल्या एका घरंदाज श्रीमंत कुटुंबातून येऊनही त्यांनी भारतामध्ये भारतीय नागरिकत्त्व स्वीकारून डॉ. भारत पाटणकर यांच्याशी विवाह केला. कासेगावसारख्या खेड्या गावांमध्ये स्वतःला सामावून घेतले. डॉक्टर गेल या सहज कष्टकरी महिलांच्या बरोबर मैत्री करून वावरत असत. त्यांचा व्यासंग प्रचंड होता. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे.