गाडगीळांकडून सूडबुद्धीने टीका
By Admin | Updated: April 25, 2015 00:07 IST2015-04-25T00:03:40+5:302015-04-25T00:07:14+5:30
प्रशांत पाटील : पदाधिकाऱ्यांतील वादावर लवकरच पडदा

गाडगीळांकडून सूडबुद्धीने टीका
सांगली : अखिल विश्व गायत्री परिवाराला जागा देण्यासंदर्भातील ठराव महासभेने फेटाळल्यानेच आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून महापालिकेवर सूडबुद्धीने टीका होत असल्याचा आरोप उपमहापौर प्रशांत पाटील यांनी केला. तसेच महापौर व गटनेते यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाल्याने हा प्रकार घडला आहे. त्यावर लवकरच पडदा पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, एलबीटीत आ. सुधीर गाडगीळ यांनी व्यापारी नेत्यांच्या पाठीशी राहून महापालिकेची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मदन पाटील यांनी व्यापारी व प्रशासनामध्ये तोडगा काढला. सत्ता आल्यानंतर कॉँग्रेस पक्षाने १०० कोटींची कामे सुरू केली आहेत. यापैकी ५० टक्के कामे पूर्ण केली असून, उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. महापालिकेच्या विकासासाठी आ. गाडगीळ यांनी निधी दिला नाही. केवळ बेकायदेशीर कामे झाल्याचा आरोप ते करत आहेत.
महापालिकेत होणाऱ्या कामांचे लेखापरीक्षण दरवर्षी शासनाकडून होते. यामुळे आ. सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेच्या कारभाराची मापे काढून राजकारण न करता नागरिकांच्या समस्यांसाठी शासनाकडून निधी आणावा, असे आवाहन उपमहापौर पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)