गाडगीळ ठरले ‘जायंट किलर’
By Admin | Updated: October 20, 2014 00:40 IST2014-10-19T23:21:15+5:302014-10-20T00:40:22+5:30
चौदा हजारांचे मताधिक्य : सांगलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

गाडगीळ ठरले ‘जायंट किलर’
सांगली : सर्व निवडणूक चाचण्या फोल ठरवत भाजपचे नवखे उमेदवार धनंजय ऊर्फ सुधीर हरी गाडगीळ यांनी आज (रविवार) सांगली विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून भाजपला पहिल्यांदाच यश मिळवून दिले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार, माजी मंत्री मदन पाटील यांचा १४ हजार ४५७ मताधिक्याने पराभव केला. शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पवार हे तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यांना ३४ हजार ६३५ मते मिळाली.
सांगली विधानसभेसाठी १५ आॅक्टोबररोजी मतदान झाले होते. एकूण १ लाख ९५ हजार ९८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज येथील मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये ८० हजार ४९७ मते मिळवून भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी विजय मिळवला. कॉँग्रेसचे मदन पाटील यांना ६६ हजार ४० मते मिळाली. त्यांचा १४ हजार ४५७ मतांनी पराभव झाला. आ. संभाजी पवार यांचे पुत्र व शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पवार यांना ३४ हजार ६३५ मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील हे चौथ्या स्थानावर राहिले. त्यांना ४ हजार ७१८ मते मिळाली. पाचव्या स्थानावर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मुन्ना कुरणे राहिले. त्यांना १ हजार ३५४ मते मिळाली.
दुपारी साडेतीन वाजता सुधीर गाडगीळ यांना सांगली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी विजयी घोषित करून त्यांना प्रमाणपत्र दिले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुधीर गाडगीळ गोदामाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. त्यानंतर विश्रमाबाग येथील भाजप कार्यालयापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
पहिल्या फेरीत शिवसेनेचे पृथ्वीराज पवार हजार मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीपासून सहाव्या फेरीपर्यंत काँग्रेसचे मदन पाटील यांचे वर्चस्व राहिले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. सातव्या फेरीमध्ये सर्वच चित्र बदलले. सातव्या फेरीअखेर गाडगीळ यांनी २ हजार १३५ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांचे मताधिक्य प्रत्येक फेरीत वाढतच गेले. चौदाव्या फेरीमध्ये त्यांचे मताधिक्य दोन हजाराने घटले. त्यानंतर त्यांचे मताधिक्य वाढत राहिले. २१ व्या फेरीनंतर १४,४५७ एवढे मताधिक्य मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करून दिवाळी साजरी केली.(प्रतिनिधी)
आघाडीच्या कारभारानेच माझा विजय : गाडगीळ
आघाडी सरकारच्या गलथान आणि भ्रष्ट कारभारामुळे जनतेने मला विजय मिळवून दिला. नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाला जनतेने साथ दिली आहे. हा विजय जनतेचा आहे. आघाडीला जनता कंटाळली होती. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
-सुधीर गाडगीळ, भाजप उमेदवार.
५१७ टपाली मते बाद
सांगली विधानसभा मतदार संघातील १५७३ पैकी ५१७ टपाली मते बाद ठरली आहेत. शिक्षकांनी मान्यतेसाठी कार्यकारी अधिकारी ऐवजी मुख्याध्यापकांचा शिक्का आणि सही वापरली. ही मते प्रशासनाने बाद ठरवली.
संघटना मजबूत करु
नवीन पक्ष, संघटना असतानाही ३५ हजारापर्यंत मते मिळाली ही किमया तरुणांमुळे झाली. आपण दिलेल्या लढ्याबाबत समाधानी आहोत. तरुणांचे संघटन मजबूत करणार आहे.
-पृथ्वीराज पवार,
शिवसेना उमेदवार.