गद्दार राजकारण्यांना मातीत गाडू

By Admin | Updated: February 15, 2015 00:49 IST2015-02-15T00:46:23+5:302015-02-15T00:49:32+5:30

संजयकाका पाटील : नांगोळे येथील कार्यक्रमात टीका; शालेय कार्यक्रम बनला राजकीय अड्डा

Gaddar politicians can eat in soils | गद्दार राजकारण्यांना मातीत गाडू

गद्दार राजकारण्यांना मातीत गाडू

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकारणात गद्दारी व दलालशाही फोफावली आहे. या फोफावलेल्या गद्दारीला व दलालशाहीला मातीत गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आज (शनिवारी) खासदार संजयकाका पाटील यांनी दिला.
नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे आदर्श विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे होते. कार्यक्रम शालेय असला तरी त्याला स्वरूप मात्र राजकीय आले.
खासदार पाटील म्हणाले की, तालुक्यात माजी राज्यमंत्री घोरपडे यांनी काही कार्यकर्त्यांना नेते केले. नेत्यांचे पदाधिकारी केले. त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु या राजकीय कृतघ्न दलालांनी स्वार्थाचे राजकारण केले व घोरपडेंच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा राजकीय गद्दारांना भविष्यात गाडल्याशिवाय उसंत घेणार नाही. जनतेनेही अशा राजकीय गद्दारांना त्यांची जागा दाखवावी. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत.
घोरपडे यांनी भाषणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आर. आर. पाटील तसेच तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडत खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले की, लोकशाहीला अर्थकारण व भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. राजकारणात ज्यांच्याकडे पैसा असेल, त्यानीच राजकारण करायचे का? मग जनतेसाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे काय? सध्याच्या राजकारणात पैशावर जनता मते विकू लागली आहे. त्यामुळे राजकारणातली सौदेबाजी सुरू झाली आहे. हे लोकशाहीला मारक आहे. अशा राजकीय सौदेबाजीतून चुकीची माणसे जनता निवडते, त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. ते तसेच राहतात. त्यामुळे जनतेनेही पैशाच्या राजकारणाला बळी पडू नये. घटनेने दिलेल्या सर्वात महत्त्वाच्या मताधिकाराचा योग्य वापर करून योग्य माणसेच राजकारणात पाठवावीत.
मी साधा आमदार नसतानाही डोंगराएवढी उपसा सिंचन योजना पूर्ण केली, परंतु तब्बल १२ वर्षे गृहमंत्रीपद भोगणाऱ्यांना साधी आगळगाव उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही, हे मोठे दुर्भाग्य आहे व शेतकऱ्यांचे नुकसान आहे. स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्यांनी काय बघून, कोणते गुण बघून यांना बारा वर्षे गृहमंत्री केले? केवळ दलालांना पोसण्याचा व सर्वसामान्य जनतेला फसविण्याचा उद्योग त्यांनी केला.
गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार पाटील व घोरपडे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. आदर्श विद्यामंदिराचे सचिव हणमंतराव मासाळ यांनी स्वागत केले, तर मुख्याध्यापक तुकाराम मासाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजपचे कवठेमहांकाळचे अध्यक्ष बाळासाहेब माने यांचेही भाषण झाले.
जि. प. सदस्य तानाजी यमगर, मिलिंद कोरे, रावसाहेब कोळेकर, सुखदेव पाटील, प्रशांत घुळी, राहुल कारंडे, रणजित घाडगे, खंडू होवाळ, पप्पू शिंदे उपस्थित होते.
अजितराव घोरपडेंची राष्ट्रवादीवर टीका
४यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील माझा पराभव केवळ राजकीय सौदेबाजीमुळे, विरोधकांनी पैशाचा वापर केल्यामुळे झाला आहे. मताला हजारावर दर देऊन व जेवणावळी घालून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. एवढा पैसा त्यांच्याकडे कुठून आला, असा सवाल अजितराव घोरपडे यांनी केला.
४तालुक्यात काही राजकीय दलाल दुकानदारी चालू ठेवण्यासाठी राजकारणात वाकडा पाय टाकत आहेत व सर्वसामान्य माणसांना वेठीस धरत आहेत. अशा राजकीय दलालांचा पाय कायमचा वाकडा केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. या दलालांनी सर्वसामान्य माणसांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे थांबवावे अन्यथा या दलालांना कायमचे जालीम औषध आपण देऊ, असा इशाराही त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
 

Web Title: Gaddar politicians can eat in soils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.