जी. एम. बियाणाला विरोध करणारे औषध कंपन्यांचे एजंट
By Admin | Updated: August 28, 2016 00:17 IST2016-08-28T00:17:32+5:302016-08-28T00:17:32+5:30
सुरेश पाटील, अजित नरदे : सांगलीत गुरुवारी शेतकरी परिषद

जी. एम. बियाणाला विरोध करणारे औषध कंपन्यांचे एजंट
सांगली : दुष्काळ आणि औषध, रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यासाठी केंद्र शासनाने जनुक बदललेले (जी. एम.) बियाणे लागवडीस परवानगी दिली पाहिजे. भारतामध्ये काही ठराविक बड्या औषध कंपन्यांच्या हितासाठी जनुकसंस्कारित लागवडीवर बंदी घातली आहे, अशी टीका राज्यव्यापी शेतकरी परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश पाटील व शेतकरी संघटनेचे अजित नरदे यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रश्नावर आदगोंडा बाबगोंडा पाटील कृषी प्रबोधन मंचतर्फे गुरुवार, दि. १ रोजी सांगलीत सकाळी १० वाजता शेतकरी परिषद आयोजित केली आहे. खासदार आणि कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शेतीचे उत्पादन वाढले तर, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकरी सध्या जे बियाणे वापरत आहे, ते कालबाह्य झाले आहे. सध्या वापरत असलेल्या बियाणांमुळे एकरी दहा ते बारा टन मका बियाणाचे उत्पादन होत आहे. परंतु, जनुकसंस्कारित बियाणांचा वापर केल्यास एकरी तीस ते चाळीस टन उत्पादन मिळणार आहे. दर कमी मिळाला तरीही उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा कमी होणार आहे. बीटी कापूस बियाणाची भारतात लागवड होत असून, त्यावर किडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे कीटकनाशक औषध फवारणीचा खर्च ८० टक्के वाचला आहे. बीटी वांगी, मका, ज्वारी, गहू, टोमॅटो, बटाटे या पिकांमध्ये जनुकसंस्कारिताचा प्रयोग यशस्वी झाला आहे. उत्पादनही वाढल्याचे सिध्द झाले आहे.
ते म्हणाले की, हा भाजीपाला व अन्न खाल्ल्यामुळे माणसाला कोणताही धोका नसल्याचे जगातील ११० नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे. अनेक राष्ट्रांमध्ये आणि विशेषत: अमेरिकेमध्येही जनुकसंस्कारित बियाणांचा वापर करून शेती केली जात आहे. कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनुकसंस्कारित पिकांच्या व्यावसायिक लागवडीस विरोध केला आहे. (प्रतिनिधी)
लोकसभेत आवाज उठविण्याची मागणी
जी. एम. बियाणाचा वापर करण्यासाठी खासदार राजू शेट्टी, खासदार संजयकाका पाटील, खा. धनंजय महाडिक यांनी लोकसभेत आवाज उठवावा, अशी मागणी परिषदेत करणार आहे. यासाठी तीनही खासदारांना शेतकरी परिषदेला बोलाविले आहे. याशिवाय, पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार, अजित नरदे, डॉ. पारखी, विजय निवळ हे कृषितज्ज्ञ शेतकरी परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.