स्थायी सभापती पदाचे भवितव्य नाराजांच्या हाती
By Admin | Updated: September 7, 2015 22:45 IST2015-09-07T22:45:55+5:302015-09-07T22:45:55+5:30
आज निवडी : संतोष पाटील-शेडजी मोहिते यांच्यात लढत; इच्छुकांच्या मनधरणीचे प्रयत्न जोमात

स्थायी सभापती पदाचे भवितव्य नाराजांच्या हाती
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसचे संतोष पाटील व राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांच्यात सरळ लढत होत आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता सभापती पदाची निवड होईल. संतोष पाटील यांच्या उमेदवारीने काँग्रेसमधील इच्छुकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचे काम सुरू असून, त्याला यश मिळाले तर, पाटील यांच्या निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस कितपत जोर लावते, यावर सभापती पदाचे गणित अवलंबून आहे.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत सभापतींची निवड होईल. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिमदिवशी काँग्रेसने संतोष पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले; तर राष्ट्रवादीकडून कुपवाडचे शेडजी मोहिते यांनी अर्ज दाखल केला आहे. पाटील, मोहिते यांच्यात खरी लढत असली तरी, नाराजांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संतोष पाटील यांच्या नावाची घोषणा काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी केले. मदनभाऊंनी दूरध्वनीवरून पाटील यांचा अर्ज दाखल करण्याची सूचना महापौर विवेक कांबळे व गटनेते किशोर जामदार यांना केली. पाटील यांना उमेदवारी मिळताच इतर इच्छुक दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे यांच्यात नाराजी पसरली. दुर्वे यांनी बंडखोर म्हणून अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला; तर दिलीप पाटील यांनी स्थायी समिती सदस्य पदाचाच राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्या सभेला दिलीप पाटील उपस्थित राहणार का? याकडे काँग्रेस सदस्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमधील पाच सदस्य पाटील यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत. यातील एक-दोन सदस्य वगळता सारेच नगरसेवक मदन पाटील यांचा शब्द अंतिम मानतात. त्यामुळे या सदस्यांनी उघड नाराजी व्यक्त केली असली, तरी ते काँग्रेसच्याविरोधात जाणार नाहीत, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला सभापती पदाच्या निवडीत फारसा रस घेतला नव्हता. केवळ विरोधक म्हणून शेडजी मोहिते यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. पण आता सारीच समीकरणे बदलल्याने राष्ट्रवादीनेही गणित जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण आता सारीच समीकरणे बदलल्याने राष्ट्रवादीनेही गणित जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. (प्रतिनिधी)
...तरच गणित जुळेल!
स्थायी समितीत काँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे पाच व स्वाभिमानी आघाडीचा एक सदस्य आहे. काँग्रेसमधील पाच नाराजांपैकी शिवाजी दुर्वे व दिलीप पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. पाटील यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने ते उद्याच्या सभेत हजर राहणार नाहीत. त्यात दुर्वे, स्वाभिमानीचा एक व राष्ट्रवादीचे पाच असे सात संख्याबळ होऊ शकते. काँग्रेसचे संख्याबळ सात होईल. पण या गोष्टी ‘जर-तर’च्या आहेत.
पाचजण नाराज
काँग्रेसमधील स्थायी समितीचे पाच सदस्य संतोष पाटील यांच्या उमेदवारीने नाराज आहेत. त्यातील चार सदस्य अज्ञातवासात गेले होते. सायंकाळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे दूरध्वनी बंद होते. रात्रीपर्यंत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. हे सदस्य काँग्रेसच्याच नगरसेवकासोबत असल्याचाही दावा केला जात होता. त्यांची नाराजी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
पाचजण नाराज
काँग्रेसमधील स्थायी समितीचे पाच सदस्य संतोष पाटील यांच्या उमेदवारीने नाराज आहेत. त्यातील चार सदस्य अज्ञातवासात गेले होते. सायंकाळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे दूरध्वनी बंद होते. रात्रीपर्यंत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. हे सदस्य काँग्रेसच्याच नगरसेवकासोबत असल्याचाही दावा केला जात होता. त्यांची नाराजी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
सभापती पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आल्याने गटनेते किशोर जामदार यांनी सदस्यांना पक्षादेश (व्हीप) बजाविला आहे. दुपारीच व्हीपची नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सभापती निवडीवेळी दगाफटका होऊ नये, याची खबरदारी जामदार यांच्याकडून घेतली जात आहे, तर नाराज सदस्यांची समजूत काढण्याची जबाबदारी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.