पवार गटाच्या भूमिकेवर सभापतीचे भवितव्य
By Admin | Updated: November 13, 2014 00:02 IST2014-11-12T23:40:28+5:302014-11-13T00:02:20+5:30
स्थायी समिती : सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून इच्छुकांची मोर्चेबांधणी

पवार गटाच्या भूमिकेवर सभापतीचे भवितव्य
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीत वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तशात राष्ट्रवादी, भाजपने सभापती पदासाठी चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेसमधील एका गटाला हाताशी धरून सभापती पदाची गणिते जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण या प्रयत्नात स्वाभिमानी आघाडीतील संभाजी पवार गटाचा मोठा अडसर आहे. पवार गटाच्या भूमिकेवर सभापती पदाची गणिते अवलंबून राहणार आहेत.
महापालिकेच्या २० रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड होईल. स्थायीत वर्णी लावण्यासाठी सर्वच पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. काँग्रेसकडून दिलीप पाटील, धोंडूबाई कलकुटगी, संतोष पाटील, प्रशांत पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. त्याशिवाय प्रदीप पाटील, अत्तहर नायकवडी यांनीही फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी वगळता सर्वच इच्छुक आहेत. नगरसेवक राजू गवळी, महेंद्र ऊर्फ बाळासाहेब सावंत, संगीता हारगे, धीरज सूर्यवंशी यांची नावे आघाडीवर आहेत, तर स्वाभिमानी आघाडीतून बाळू गोंधळी, अश्विनी खंडागळे, जगन्नाथ ठोकळे, युवराज बावडेकर इच्छुक आहेत. स्वाभिमानीत फूट पडल्याने स्थायीत कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. स्वाभिमानीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष नगरसेवक उमेश पाटील, शांता जाधव यांनीही दावा केला आहे. स्वाभिमानीत संभाजी पवार गट व भाजप असा उभा संघर्ष पेटला आहे. त्यात गटनेते शिवराज बोळाज हे पवार गटाचे असल्याने स्थायीत याच गटाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी गटाच्या सदस्यावर स्थायी समिती सभापती पदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. काँग्रेसमधील एक गट सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. या गटाचा एक सदस्य स्थायीत आहे. राष्ट्रवादीचे पाच व स्वाभिमानीचे दोन अशा सात सदस्यांना काँग्रेसच्या नाराज गटाची मदत झाल्यास सभापती पदाचे चित्र बदलू शकते. त्यामुळे काँग्रेसनेही सावध पवित्रा घेतला आहे. पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा ऐनवेळी उगारला जाऊ शकतो. तशी तयारी काँग्रेसने केली आहे. स्थायी सदस्य निवडीनंतर सभापती पदाची गणिते जुळविली जाणार आहेत. त्यामुळे स्थायीत कोणाची वर्णी लागते, यावर भविष्यातील पालिकेचे राजकारण ठरणार आहे. (प्रतिनिधी)
पाटील, मेंढेंमध्ये चुरस
स्थायी सभापती पदासाठी काँग्रेसमधून मिरजेचे संजय मेंढे व सांगलीवाडीचे नगरसेवक दिलीप पाटील यांच्यात चुरस आहे. भविष्यात महापौरपद मिरजेला देण्याचे निश्चित झाल्यास सभापती पदावर सांगलीचा दावा कायम राहणार आहे. सांगलीतून दिलीप पाटील यांचेच नाव आघाडीवर आहे. पण पहिल्या वर्षात सांगलीला संधी दिल्याने मिरजकर नगरसेवकांनी सभापती पदासाठी माजी मंत्री मदन पाटील यांच्याकडे आग्रह धरला आहे. त्यामुळे पाटील कोणाला संधी देतात, याची उत्सुकता लागली आहे.