फुपेरेच्या मारुती गायकवाडांची उपायुक्त पदाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:24+5:302021-06-21T04:18:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : फुपेरे (ता. शिराळा) येथील मारुती शामराव गायकवाड यांची मीरा - भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती ...

Fupare's Maruti Gaikwad gets the post of Deputy Commissioner | फुपेरेच्या मारुती गायकवाडांची उपायुक्त पदाला गवसणी

फुपेरेच्या मारुती गायकवाडांची उपायुक्त पदाला गवसणी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : फुपेरे (ता. शिराळा) येथील मारुती शामराव गायकवाड यांची मीरा - भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. गायकवाड यांची २००९मध्ये एमपीएससी परीक्षेतून मुख्याधिकारीपदी निवड झाली होती. त्यानंतर सहाय्यक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त असा प्रवास करत आज ते उपायुक्तपदी रुजू झाले आहेत.

फुपेरेसारख्या खेडेगावात शेतकरी कुटुंबातील मारुती गायकवाड यांनी प्रथमवर्ग अधिकारी (उपायुक्त)पद मिळविल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

मारुती गायकवाड यांनी नुकताच मीरा - भाईंदर महानगरपालिकेत उपायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. गायकवाड यांचे बालपण फुपेरे येथे गेले. शेतकरी कुटुंबातील एक होतकरू मुलगा म्हणून गाव त्यांच्याकडे पाहत होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यानंतर चिखली, कोकरूड येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बी. एस्सी. (मत्स्यव्यवसाय)चे शिक्षण घेतले. वडील शामराव गायकवाड यांनी त्यांना कष्टाने व जिद्दीने शिक्षण दिले.

मारुती गायकवाड यांनी २००९मध्ये एमपीएससी परीक्षेत यश संपादन केले. मुख्याधिकारी म्हणून उमरी (नांदेड) येथून त्यांनी प्रशासकीय सेवा सुरु केली. पुढे त्यांनी ठाणे, भिवंडी मनपात सहाय्यक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहिले. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटवला. नुकतीच त्यांची मीरा - भाईंदर मनपाच्या उपआयुक्तपदी वर्णी लागली आहे.

चौकट

सामाजिक कार्यात सहभाग

मारुती गायकवाड हे उच्चपदस्थ अधिकारी असले तरी त्यांनी आपल्या गावाचा विसर पडू दिलेला नाही. गावातील सर्व सामाजिक कार्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. एकंदरीत गायकवाड यांना आता उपायुक्तपद मिळाल्याने ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Fupare's Maruti Gaikwad gets the post of Deputy Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.