शहरातील चिल्ड्रन पार्कसाठी उपसूचनेद्वारे निधी वळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:44+5:302021-02-05T07:21:44+5:30
सांगली : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीकडील ९० लाख रुपयांचा निधी चिल्ड्रन पार्कसाठी वळविण्यात आला आहे. त्यासाठी समितीची ...

शहरातील चिल्ड्रन पार्कसाठी उपसूचनेद्वारे निधी वळविला
सांगली : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीकडील ९० लाख रुपयांचा निधी चिल्ड्रन पार्कसाठी वळविण्यात आला आहे. त्यासाठी समितीची मान्यताही घेण्यात आलेली नाही. स्थायी समितीत उपसूचनेद्वारे हा ठराव घुसडण्यात आल्याने नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील नेमिनाथ नगर येथील खुल्या भूखंडावर लहान मुलांसाठी महापालिकेच्यावतीने चिल्ड्रन पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कसाठी ९० लाख रुपयांचा निधी महिला व बाल कल्याण समितीकडून वर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्याला काँग्रेसच्या नगरसेविका शुभांगी साळुंखे, आरती वळवडे यांनी विरोध केला. याप्रकरणी नगरविकास मंत्री व शासनाकडेही त्यांनी तक्रार केली होती. त्यामुळे स्थायी समितीने १ जानेवारीच्या सभेत हा विषय परत पाठविण्याचे आदेश देण्यात आले; पण आता मात्र सभापती पांडुरंग कोरे यांनी भूमिका बदलली आहे. १४ जानेवारीच्या सभेत उपसूचनेद्वारे निधी वर्गचा ठराव करण्यात आला आहे.
ही उपसूचना राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिती यांनी दिली आहे. महिला व बाल कल्याण समितीची सभा झालेली नाही. मार्चपूर्वी हा निधी खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा निधी तातडीने वर्ग करून हे काम करावे, अशी उपसूचना मोहिते यांनी मांडली. याला सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. या ठरावाबाबत महिला व बाल कल्याण समितीतील सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समिती सदस्यांचा विरोध असताना व समितीची मान्यता नसताना हा निधी वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता नगरसेविकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.