जिल्ह्यातील आमदारांचा निधी रस्त्यांवरच खर्च
By Admin | Updated: July 25, 2014 23:37 IST2014-07-25T23:04:15+5:302014-07-25T23:37:31+5:30
फंडाचा विनियोग : व्यायामशाळा, समाजमंदिरांना प्राधान्य

जिल्ह्यातील आमदारांचा निधी रस्त्यांवरच खर्च
अंजर अथणीकर - सांगली
जिल्ह्यातील विधानसभा सदस्य असणाऱ्या आठ आमदारांचा बहुतांशी निधी रस्ते बांधकाम, मुरुमीकरण, काँक्रिटीकरणासाठीच खर्च झाला आहे. आठ आमदारांनी एकूण १४१ रस्त्यांची कामे गतवर्षात करून घेतली आहेत. त्यानंतर २०१३-१४ या आर्थिक वर्षात २८ व्यायामशाळा, तर २० समाजमंदिरे बांधण्यात आली. नळपाणी पुरवठा योजनांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील आठ आमदारांनी सात कोटी दहा लाख रुपयांचा निधी रस्ते बांधकामासाठी खर्च केला आहे. सुमारे दीड कोटी रुपये व्यायामशाळा बांधणीवर, तर कोटीहून अधिक रक्कम समाजमंदिर, सभामंडप बांधकामावर खर्च केली आहे. सुमारे सात कोटीचा निधी मात्र शाळांना, कार्यालयांना संगणक पुरविणे, दिवाबत्ती, गटारी, कूपनलिका खुदाई, पिकअप् शेड, स्मशानभूमीचे कुंपण बांधणे, नळपाणी पुरवठ्यावर खर्च करण्यात आला आहे.
शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सुमारे ८५ लाख रुपये खर्चून २१ रस्त्यांचे बांधकाम करून घेतले आहे. पाणीटंचाई निवारणासाठी त्यांनी २० लाख रुपये खर्च केले असून, सुमारे ४५ लाख रुपयांच्या ९ व्यायामशाळा त्यांनी बांधल्या आहेत. जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील १५ रस्त्यांसाठी निधी खर्च केला आहे. यासाठी त्यांना सुमारे ७५ लाख रुपये खर्च आला असून, पाणीटंचाई निवारणार्थ सोळा, तर सभामंडप, भवन बांधण्यासाठी ९ लाखाचा निधी त्यांनी खर्च केला आहे.
सांगलीचे आमदार संभाजी पवार यांचा सर्वाधिक निधी रस्त्यांसाठीच खर्च झाला आहे. पेव्हिंग ब्लॉक बसविणे, मुरुमीकरण, डांबरीकरण आदी २७ कामे करून त्यावर त्यांनी सुमारे सव्वा कोटीचा निधी खर्च केला आहे. शासकीय कार्यालये, शाळांनाही त्यांनी संगणक संचांचा पुरवठा करून त्यावर पंधरा लाख रुपये खर्च केला आहे. जत या दुष्काळी मतदारसंघातील आमदार प्रकाश शेंडगे यांनी सर्वाधिक समाजमंदिरे बांधली आहेत. त्यांनी सुमारे ५० लाखांची दहा समाजमंदिरे बांधली असून सात व्यायामशाळा बांधल्या आहेत. पलूस, कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पतंगराव कदम यांनी २३ रस्त्यांची बांधकामे करून दोन व्यायामशाळा व दोन समाजमंदिरे उभारली आहेत. त्यांनी सुमारे १ कोटी २० लाखांचा निधी रस्ते दुरुस्ती व बांधकामासाठी खर्च केला आहे. आर. आर. पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात १८ रस्ते उभारले असून, त्यावर त्यांना सुमारे ९० लाखांचा खर्च आला आहे. चार समाजमंदिरे, सांस्कृतिक भवन व तीन व्यायामशाळाही त्यांनी बांधल्या आहेत. खानापूरचे आमदार सदाशिवराव पाटील यांनी सोळा रस्त्यांसाठी सुमारे ९५ लाखांचा निधी दिला आहे. दोन सभागृहांबरोबर चार व्यायामशाळा व दोन एसटीची पिकअप् शेड त्यांनी बांधली आहेत.
पाणीटंचाई निवारणाकडे सर्वांचेच दुर्लक्ष
मिरज तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची चाळण झाली असताना तेथील आमदार सुरेश खाडे यांनी केवळ दहा रस्त्यांवर निधी खर्च केला आहे. समाजमंदिरे, सभामंडप व व्यायामशाळा यावर त्यांनी सुमारे ३५ लाखांचा निधी खर्च केला आहे. तो निधी रस्त्यांवर खर्च केला असता तर प्रश्न मिटला असता!
जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी सर्वाधिक निधी समाजमंदिरांवर खर्च केला आहे. त्यांनी गतवर्षात दहा समाजमंदिरे व सभामंडप बांधले आहेत. त्यावर खर्च केलेले ५० लाख पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या गावांवर खर्च करणे आवश्यक होते, अशा तक्रारी ग्रामस्थ करत आहेत.