कडेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:41+5:302021-06-09T04:33:41+5:30
कडेगाव शहराचा डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वांगीण विकास केला आहे. कडेगाव ही त्यांची राजधानी आहे. त्यामुळे या शहराच्या सर्वांगीण ...

कडेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
कडेगाव शहराचा डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वांगीण विकास केला आहे. कडेगाव ही त्यांची राजधानी आहे. त्यामुळे या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. येत्या काही दिवसांत नगरपंचायतीला नगरविकास खात्यामार्फत ४ कोटींचा निधी देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
कडेगाव नगरपंचायत कार्यालयात पाच ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर मशीनचा लोकार्पण सोहळा डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ, नगराध्यक्षा संगीता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव उपस्थित होते. डॉ. कदम म्हणाले,
नगरपंचायत प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. यामुळे शहरांतील रुग्णसंख्या आता आटोक्यात येऊ लागली आहे. परंतु, नागरिकांनी तरीही काळजी घेणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला हद्दपार करू शकू.
शहरात प्रभागवार विविध विकासकामे राबविण्यासाठी यापूर्वी दोन कोटींवर निधी दिला आहे. या पुढेही नगरविकासासह विविध विभागांकडून येथे विविध विकासकामे राबविण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
नगराध्यक्षा संगीता राऊत, सागर सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. नगरपंचायतीने खरेदी केलेल्या पाच ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर मशीनचे लोकार्पण विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी सरपंच विजय शिंदे, नगरसेवक साजिद पाटील, वैभव देसाई, सुनील पवार, नितीन शिंदे, रिजवाना मुल्ला, संगीता जाधव, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाइंगडे उपस्थित होते. मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी आभार मानले.
फोटो : ०७ कडेगाव २
ओळ : कडेगाव येथे ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर मशीनचे लोकार्पण डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, दीपक भोसले, सुरेश निर्मळ, नगराध्यक्षा संगीता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव उपस्थित हाेते.