सिध्देवाडीत क्रीडांगणासाठी निधी देऊ
By Admin | Updated: November 30, 2014 22:11 IST2014-11-30T22:11:05+5:302014-11-30T22:11:05+5:30
उत्तमराव वाघमोडे : शिक्षकांच्या अडीअडचणी व कामकाजाची घेतली माहिती

सिध्देवाडीत क्रीडांगणासाठी निधी देऊ
मालगाव : सिध्देवाडी (ता. मिरज) येथील प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंती व क्रीडांगणासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांनी दिले. यावेळी त्यांनी शाळेच्या कामकाजाचीही माहिती घेत शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
गटविकास अधिकारी वाघमोडे हे ग्रामस्वच्छतेच्या कार्यक्रमासाठी सिध्देवाडी येथे आले होते. यावेळी वाघमोडे व पंचायत समितीच्या सदस्या सारिका खताळ यांनी शाळेला भेट दिली. शिक्षकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नव्याने बांधण्यात आलेल्या आठ शाळा खोल्यांच्या बांधकामाची पाहणी केली. कमी निधीत चांगल्या प्रतीचे बांधकाम केल्याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे कौतुक केले. शाळेच्या शौचालयांचीही पाहणी केली. गटविकास अधिकाऱ्यांनी शाळेत वृक्ष लागवडीचा मुद्दा उपस्थित केला असता, संरक्षक भिंतीअभावी वृक्ष लागवड करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुबेर खोत, शिक्षक रामचंद्र चव्हाण यांनी संरक्षक भिंत व क्रीडांगणासाठी निधीची आवश्यकता असल्याची समस्या मांडली. गटविकास अधिकारी वाघमोडे यांनी या मागणीची दखल घेत दोन्ही कामांचे ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव पाठविण्याची व्यवस्था करा, निधी मिळवून देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. दत्तात्रय कवठेकर, संजना शेळके, विद्या कांबळे, अश्विनी विटेकरी, सुवर्णा गळवे उपस्थित होते. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांची घेतली परीक्षा !
शाळा भेटीत गटविकास अधिकारी वाघमोडे यांनी इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सामान्यज्ञानाबाबत परीक्षा घेतली. प्रारंभी त्यांनी विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. वाचनात विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येताच त्यांनी सामान्यज्ञानाचा एक भाग म्हणून गावच्या सरपंचांचे नाव विचारले. विद्यार्थ्यांनी तात्काळ उत्तर दिले. शिक्षक रामचंद्र चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे नाव विचारले असता, उत्तमराव वाघमोडे या दिलेल्या उत्तराने गटविकास अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.