टेंभू उपसा योजनेसाठी ५०० कोटींचा निधी द्या
By Admin | Updated: March 18, 2015 00:03 IST2015-03-17T23:18:06+5:302015-03-18T00:03:51+5:30
ठिबकचा वापर करा : श्रमिक मुक्ती दलाची मोर्चाद्वारे मागणी

टेंभू उपसा योजनेसाठी ५०० कोटींचा निधी द्या
सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे मुख्य आणि पोटकालवे वगळता बंद जलवाहिनीद्वारेच पाणी शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ५०० कोटी रूपये निधीची येत्या अंदाजपत्रकात तरतूद करावी, या प्रमुख मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. कार्यकर्त्यांचा उद्रेक लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या वारणाली (सांगली) येथील कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होते. वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाणे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाटणकर यांनी टेंभू योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ५०० कोटींच्या निधी तरतूद करावी, ही मागणी शासनाकडे पाठवावी. शासनाने या नदीची तरतूद केली नाही, तर बेमुदत आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला आहे. मुख्य आणि पोटकालवे वगळता शेतीला बंद जलवाहिनीद्वारेच पाणी द्यावे. टेंभू योजनेचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शंभर टक्के शेतीला ठिबकद्वारेच पाणी देण्याच्या मागणीबाबतही चर्चा झाली. शासनाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. ठिबक सिंचन योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन सर्व सहकार्य करेल, असेही गुणाणे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
आंदोलनात आनंदराव पाटील, विजयसिंह पाटील, मोहनराव यादव, अण्णासाहेब पत्की, अशोक लवटे, अमोल कुंभार, भारत पाटील, दत्तात्रय पाटील, जालिंदर मेटकरी आदींसह शेतकरी सहभागी होते. (प्रतिनिधी)