देशाच्या प्रगतीत अभियंत्यांचा मौलिक वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:22+5:302021-09-18T04:28:22+5:30
वारणावती : अभियंता म्हणजे केवळ काही पुस्तके वाचून मिळविलेल्या पदवीतून निर्माण झालेले पद नाही. देशाच्या प्रगतीत अभियंत्यांचा मौलिक वाटा ...

देशाच्या प्रगतीत अभियंत्यांचा मौलिक वाटा
वारणावती : अभियंता म्हणजे केवळ काही पुस्तके वाचून मिळविलेल्या पदवीतून निर्माण झालेले पद नाही. देशाच्या प्रगतीत अभियंत्यांचा मौलिक वाटा असतो, असे प्रतिपादन मांगले (ता.शिराळा) येथील वीज वितरण कंपनीतील अभियंता स्वप्नजा गोंदिल यांनी केले.
कोटेश्वर महिला मंडळातर्फे अभियंता दिन व शिक्षक गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इन्फोसिसच्या अभियंता प्रणाली खबाले-पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होत्या. प्रारंभी हायर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सर्जेरावदादा नाईक बँकेचे उपाध्यक्ष सुधाकर हसबनीस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्वप्नजा गोंदिल म्हणाल्या की, अभियंता झाल्यानंतर आपली जबाबदारी ओळखून स्वतःला झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे.
मंडळाच्या कार्याध्यक्षा प्राचार्य डॉ.उज्ज्वला पाटील म्हणाल्या, अभियंता दिन हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी पदवी मिळाल्यानंतर फार मोठ्या पॅकेजच्या मागे न धावता अध्यापन, उच्च शिक्षण व संशोधन यावर भर द्यावा.
ॲड.स्मिता खुर्द म्हणाल्या, देशाच्या प्रगतीत गुरुजनांबरोबर अभियंत्यांचा फार मोठा वाटा आहे. मागील दीड वर्षाचा काळ हा शैक्षणिक स्तरावर आव्हान देणारा काळ होता, तरीही आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षक ज्ञानाचा वारसा पुढे चालवित आहेत.
नंदिनी काटकर यांनी स्वागत केले. या प्रसंगी इन्फोसिसच्या अभियंता प्रणाली खबाले-पाटील, वर्धा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुमंत महाजन, रवींद्र कदम, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीला कुरणे, कार्याध्यक्षा डॉ.उज्ज्वला पाटील, उपाध्यक्षा सरोजिनी कदम, सचिव संगीता खटावकर, कोषाध्यक्षा सुचेता हसबनीस, कल्पना खबाले, सुखदा महाजन आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.