नेर्ले परिसरात पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:08+5:302021-02-06T04:49:08+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता माजी सरपंच व रयत ...

नेर्ले परिसरात पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा वावर
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता माजी सरपंच व रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांना स्वातंत्र्यसैनिक मोहनराव पाटील गुरुजी यांच्या मळ्याजवळून जात असताना बिबट्याचे दर्शन झाले. वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे शेतकरीवर्गात घबराटीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने नेर्ले परिसरात दिसणाऱ्या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी पाटील यांनी मागणी केली आहे.
माजी सरपंच लालासाहेब पाटील हे शुक्रवारी पहाटे ५ वाजता दुचाकीवरून निघाले होते. पाटील गुरुजी यांच्या मळ्यापासून पुढे जात असताना दुचाकीच्या उजेडात १५ ते २० फुटांवर रस्त्यावर उडी मारलेल्या बिबट्याचे त्यांना दर्शन झाले. दुचाकीच्या आवाजाने बिबट्याने गव्हाच्या शेतात पलायन केले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असल्याचे पाटील यांनी सांगितले. याचवेळी धोंडीराम कुबेर यांच्या वस्तीवर जाऊन बिबट्याने त्यांच्या शेळीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
बिबट्याच्या वावरामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महामार्गावर केदारवाडी व इटकरे या ठिकाणी रात्रीचे वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत यापूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे. बिबट्याचा बंदोबस्त तातडीने करावा, अशा मागणीचे निवेदन पाटील यांनी जिल्हाधिकारी सांगली व संबंधित वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे. तातडीने बंदोबस्त न झाल्यास रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चौकट
पाटील वृत्तपत्र वितरक
माजी सरपंच लालासाहेब पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘लोकमत’च्या अंक वितरणाचे काम करतात. हे अंक वितरणाचे काम ते अत्यंत मनस्वीपणे करत असतात. पदापेक्षा श्रमाला प्रतिष्ठा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. शुक्रवारी पहाटेच्या वेळी ‘लोकमत’चा अंक वाचकांकडे वितरित करण्यासाठी जात असतानाच त्यांना अवघ्या १५ फुटांवरून या बिबट्याचे दर्शन झाले.