इंधन दरवाढ, महिला अत्याचारप्रश्नी राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:16+5:302021-01-13T05:08:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करीत सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाहन ढकलण्याचे ...

इंधन दरवाढ, महिला अत्याचारप्रश्नी राष्ट्रवादीचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध व्यक्त करीत सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाहन ढकलण्याचे आंदोलन करीत केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.
युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विजयनगर येथून दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आल्या. यावेळी इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. यावेळी राहुल पवार म्हणाले की, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्यांना महागाईच्या आगीत ढकलण्यात आले आहे. केंद्र सरकारने उद्योगपतींना जगविण्याचे काम करताना सामान्य लोकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे. अच्छे दिन ते नेमके कोणासाठी आणत आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. रोजंदारीवर ज्यांचे घर चालते त्यांनी गॅस विकत घ्यायचा कसा? असा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यामुळे आम्ही या गॅस दरवाढीचा निषेध करीत आहोत.
केंद्र शासनाने सर्व इंधनांवरील दरवाढ मागे घ्यावी, गॅसवरील अनुदान तातडीने सुरू करावे, अन्यथा टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करीत राहू, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे अजिंक्य पाटील, संदीप व्हनमाने, अक्षय अलकुंटे, मदन पाटील, सागर माने, विशाल हिप्परकर, विज्ञान माने, पप्पू कोळेकर, संदीप कांबळे, अजित दुधाळ, अकबर शेख, शुभम जाधव, ऋषिकेश कांबळे, संजय तोडकर, मोसीन सय्यद, सुजित पाटील, साकीब पठाण आदी सहभागी झाले होते.
चौकट
महिला राष्ट्रवादीतर्फे थाळीनाद
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने उत्तर प्रदेशातील बलात्कारप्रकरणी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा विनया पाठक म्हणाल्या, संपूर्ण देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. देशातील एकूण महिला अत्याचाराच्या घटनांपैकी एकट्या उत्तर प्रदेशात १५ टक्के घटना घडल्या. त्यामुळे उत्तर प्रदेश हे सर्वात असुरक्षित राज्य आहे. योगी सरकारच्या काळात यात वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करीत आहोत, असे त्या म्हणाल्या. आंदोलनात ज्योती अदाटे व अन्य महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.