सांगलीत दुप्पट दर देऊनही फळे मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:11+5:302021-05-09T04:27:11+5:30
सांगली : कोरोनात रुग्णाला फळे खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक पूर्ण सांगली फिरले; पण त्यांना कुठेही फळे मिळाली ...

सांगलीत दुप्पट दर देऊनही फळे मिळेनात
सांगली : कोरोनात रुग्णाला फळे खाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक पूर्ण सांगली फिरले; पण त्यांना कुठेही फळे मिळाली नाहीत. विष्णूअण्णा फळ मार्केटचे सौदे बंद असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे फळे नसल्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत.
कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमधील होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधारी यांनी सौद्यावर बंदी घातली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सौदे आणि किरकोळ विक्रेत्याकडील फळ विक्री बंद आहे. काही किरकोळ विक्रेत्यांकडे फळे शिल्लक होती, तीही त्यांनी दुप्पट दराने विक्री करून संपविली आहेत. सौदे बंद असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडेही फळे शिल्लक नाहीत. यामुळे कोरोना रुग्णांसाठी सफरचंद, चिकू, डाळिंब, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट आदी फळे देण्याची सूचना देऊनही फळे उपलब्ध नसल्यामुळे देता येत नाहीत. नातेवाईक सर्व शहरातून फळांची उपलब्धता करण्यासाठी फिरत आहेत; पण कुठेही फळे मिळत नाहीत. यामुळे फळ मार्केटच्या सौदे बंदचा आणि विक्रीचा कोरोना रुग्णांना फटका बसत आहे.
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फळ मार्केट बंद -महेश चव्हाण
जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढून कोरोनाची गर्दी टाळण्यासाठी वसंतदादा मार्केटसह विष्णूअण्णा फळ मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फळ मार्केटचे सौदे गुरुवारपासून बंद आहेत. पुन्हा एखदा जिल्हाधिकारी यांना फळ मार्केटचे साैदे सुरू करण्याबाबत विनंती करणार आहे, त्यांनी परवानगी दिली तरच सोदे निघतील, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.
चौकट
सांगलीत कुठेही फळे मिळाली नाहीत
माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. डॉक्टरांनी मोसंबी, किव्ही, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद आदी फळे खाण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार सर्व सांगलीत फळ उपलब्ध करण्यासाठी फिरूनही कुठे मिळाली नाहीत, रुग्णाला आता काय द्यायचे, हेच आम्हाला कळत नाही. जिल्हाधिकारी यांनी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी फळे उपलब्धतेसाठी काही तरी मार्ग काढावा, अशी मागणी सविता जाधव यांनी केली.
चौकट
आंबा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
रमजानमध्ये फळांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे रुग्णांसाठीही फळे पोषक असल्यामुळे मागणी आहे; परंतु प्रशासनाच्या आदेशामुळे आम्हाला विष्णूअण्णा फळ मार्केटचे सौदे बंद ठेवावे लागले आहेत. विक्रेत्यांकडे फळे कुठून येणार आहेत. अक्षयतृतीयेला आंब्याची मागणी मोठी असल्यामुळे विक्रेत्यांनी आंबे पिकविले आहेत. या आंब्यास मार्केट नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया विष्णूअण्णा होलसेल फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आलदर यांनी दिली.