पोलिसांच्या कष्टाचे ‘महसूल’ला फळ
By Admin | Updated: May 27, 2014 01:20 IST2014-05-27T01:14:55+5:302014-05-27T01:20:43+5:30
साडेसहा लाख जमा : गुन्ह्यांतील २०७ वाहनांचा लिलाव पूर्ण

पोलिसांच्या कष्टाचे ‘महसूल’ला फळ
सांगली : वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवाराज गंजत पडलेल्या विविध गुन्ह्यांतील २०७ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया आज (सोमवार) पोलीस मुख्यालयात पार पडली. वाहने घेण्यासाठी लिलावात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने सर्व वाहनांची विक्री झाली. यातून सहा लाख ५७ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा झाला. मात्र हा महसूल पोलीस कल्याण निधीला मिळाला नाही. पोलिसांना तो शासनाच्या महसूल विभागाच्या तिजोरीत जमा करावा लागला. जिल्ह्यात २२ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात विविध गुन्ह्यांतील व बेवारस सापडलेली शेकडो वाहने गंजत पडली आहेत. ही वाहने मूळ मालकांनी घेऊन जावीत, यासाठी सहा महिन्यांपूर्वी निवेदन प्रसिद्ध केले होते. वाहनांच्या इंजिन व चेस क्रमांकावरून मालकांचा शोध घेण्यात आला. ज्यांची वाहने आहेत, त्यांना परत घेऊन जाण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मुदतीत वाहने नेली नाहीत, तर लिलाव पद्धतीने विक्री केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता. एकूण ९४१ वाहने होती. निवेदन प्रसिद्ध केल्यामुळे ४१५ वाहने मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून परत नेली. ६१० वाहने शिल्लक होती. यातील २०९ वाहनांचा लिलाव काढण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी जाहीर केले होते. सोमवारी सकाळी लिलाव प्रक्रियेस प्रारंभ झाला. पोलीसप्रमुख सावंत, उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाहने खरेदी करण्यासाठी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले होते. शंकर रामचंद्र आॅक्शनर प्रा. लि. पुणे यांनी वाहनांचा लिलाव केला. वाहनाची स्थिती पाहून त्याची किंमत ठरविण्यात आली. त्यानंतर नागरिकांना बोली बोलण्यास परवानगी देण्यात आली. दीड हजारापासून ते अठरा हजारापर्यंत वाहनांना किंमत आली. (प्रतिनिधी)