विट्यात सभापतीसाठी मोर्चेबांधणी
By Admin | Updated: August 27, 2015 23:17 IST2015-08-27T23:17:26+5:302015-08-27T23:17:26+5:30
बाजार समिती : ३ सप्टेंबरला होणार निवडी, यंदा संधी खानापूर की कडेगावला?

विट्यात सभापतीसाठी मोर्चेबांधणी
विटा : विटा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना, कॉँग्रेस व भाजप युतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता सभापतीपदासाठी भाऊगर्दी झाली असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दि. ३ सप्टेंबरला निवड होणार आहे. खानापूर तालुक्यातील कॉँग्रेसचे आनंदराव पाटील व शिवसेनेचे राहुल साळुंखे आणि चंद्रकांत चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, सभापतीपद खानापूर की कडेगाव तालुक्याला द्यायचे, याबाबतचा अंतिम निर्णय नेतेमंडळींच्या बैठकीतच होणार आहे.
खानापूर व कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी युती केली होती, तर या युतीला कॉँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून लढत दिली होती. या निवडणुकीत शिवसेना, भाजप व कॉँग्रेस युतीला निर्विवाद बहुमत मिळाले. विरोधी पॅनेलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते.
या निवडणुकीनंतर आता सभापती व उपसभापती पदासाठी दि. ३ सप्टेंबरला निवड प्रक्रिया होत आहे. इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम समर्थक मंगरूळचे आनंदराव पाटील, करंजे येथील भानुदास सूर्यवंशी, उपाळे-वांगीचे आनंदा माने यांच्यासह शिवसेनेचे आ. अनिल बाबर समर्थक कमळापूरचे राहुल साळुंखे, तांदळगावचे चंद्रकांत चव्हाण आदी इच्छुकांनी नेत्यांना साकडे घातल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)
एक वर्षासाठी मिळणार संधी
सभापतीपद पहिल्यांदा कोणत्या तालुक्याला द्यायचे, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. दि. ३ सप्टेंबरला निवड प्रक्रिया होणार असल्याने त्यापूर्वी एक दिवस अगोदर आ. अनिल बाबर, मोहनराव कदम व पृथ्वीराज देशमुख यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सभापतीपदाचा अंतिम निर्णय होणार असून, या पदावर प्रत्येकी एक वर्षासाठी संधी देण्यात येणार असल्याचे समजते. सभापती व उपसभापती पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम समर्थक मंगरूळचे आनंदराव पाटील, करंजे येथील भानुदास सूर्यवंशी, उपाळे-वांगीचे आनंदा माने यांच्यासह शिवसेनेचे आ. अनिल बाबर समर्थक कमळापूरचे राहुल साळुंखे, तांदळगावचे चंद्रकांत चव्हाण आदी इच्छुकांनी नेत्यांना साकडे घातले आहे. ३ सप्टेंबरच्यापूर्वी दोन दिवस अगोदर सभापती व उपसभापतींची निवडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.