वीज दरवाढीविरोधात मोर्चा
By Admin | Updated: December 22, 2016 00:02 IST2016-12-22T00:02:51+5:302016-12-22T00:02:51+5:30
इरिगेशन फेडरेशन आक्रमक : ‘महावितरण’च्या कारभाराचा सांगलीत निषेध

वीज दरवाढीविरोधात मोर्चा
सांगली : इरिगेशनच्या शेतीपंपाच्या बिलावर केलेली व्हिलिंग चार्जेसची आकारणी बंद करण्यात यावी, शेतीपंपास मीटर बसविण्यात यावेत, शेतीपंपांच्या मीटरचे रीडिंग घेऊनच वीज बिलांची आकारणी करण्यात यावी, यांसह इतर मागण्यांसाठी बुधवारी राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने विश्रामबाग येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरूवात झाली. महावितरणने व्हिलिंग चार्जेस म्हणून प्रति युनिट ८२ पैसे वाढ लागू केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन, महावितरणला निर्णय बदलण्यास भाग पाडण्याचा इशाराही कार्यक र्त्यांनी दिला.
महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी गावाने एकत्र येऊन लिफ्ट इरिगेशन योजना उभारल्या आहेत. प्रसंगी स्वत:ची जमीन गहाण ठेवून, कर्ज काढून योजनांची उभारणी करण्यात आली आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असताना, शासनाकडून यास कोणतीही मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत १ जून २०१५ ला वीज बिलात प्रति युनिट ४४ पैशांची वाढ करण्यात आली. यास इरिगेशन फेडरेशनने विरोध केल्यानंतर दर कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. आता व्हिलिंग चार्जेस म्हणून ८२ पैसे प्रति युनिट वाढ लागू केली आहे. त्यामुळे दुप्पट वीज बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे इरिगेशन योजना बंद पडणार आहेत.
यावेळी अरूण लाड, माजी आ. संजय घाटगे, विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रतापराव होगाडे, जे. पी. लाड, आर. जे. तांबे, दिनकर पाटील, अॅड. सयाजीराव पाटील, अॅड. अजितराव सूर्यवंशी, तेजस्विनी सूर्यवंशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वीज तोडणाऱ्यांचे हात रोखा : एन. डी. पाटील
शेतकरीवर्ग अगोदरच अडचणीत असताना, महावितरणकडून दरवाढ करून अन्याय केला आहे. ही दरवाढ परतवून लावण्यासाठी आक्रमक होण्याची गरज असून, ही लढाई अस्तित्वाची लढाई झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतीला पाण्याची गरज निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन तोडायला येणाऱ्यांचे हात रोखा, असे आवाहन ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केले. महावितरणला वठणीवर आणण्यासाठी आता मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले पाहिजेत. बहुतांश शेतीपंपांना मीटर बसविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मीटर नाही तर बिल भरणार नाही, अशी भूमिका आता घ्यायला हवी. महावितरणला आपल्या चुका आणि चोऱ्यामाऱ्या थांबविता येत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
व्हिलिंग चार्जेस आकारणी बंद करा आणि दरवाढ
रद्द करा.
शेतीपंपास मीटर बसवा, अन्यथा वीज बिलाची आकारणी करू देणार नाही.
शेतीपंपांचे मीटर रीडिंग घेऊनच बिलाची
आकारणी करावी.
वीज बिलाच्या पावत्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत.
वीज गळती पूर्णपणे थांबवा, वीज चोरीवर नियंत्रण आणा.