भेदरलेली चिमुकली अन् हृदयशून्य पोलीस

By Admin | Updated: August 12, 2014 23:19 IST2014-08-12T22:55:24+5:302014-08-12T23:19:33+5:30

मुलीवर अतिप्रसंग : दखलपात्र गुन्हा म्हणजे नेमके काय? पालकांसह नागरिकांनी उपस्थित केला प्रश्न

A frightened tweezers or heartless police | भेदरलेली चिमुकली अन् हृदयशून्य पोलीस

भेदरलेली चिमुकली अन् हृदयशून्य पोलीस

अविनाश कोळी -सांगली -- तिचे वय अवघे १३ वर्षे... सकाळी सातची वेळ... शाळेला जाणाऱ्या या चिमुकलीवर एका विकृताने झडप मारली... बलात्काराचा त्याचा प्रयत्न फसला, मात्र त्याने तिला गंभीररित्या जखमी केले. आजूबाजूच्या महिलांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला, मात्र हृदयशून्य पोलिसांनी तिच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले.
सांगलीच्या शिवोदयनगर येथील ही घटना गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात अनेकांच्या काळजाचा थरकाप उडवत आहे. नेहमी मैत्रिणींबरोबर शाळेत जाणारी ही चिमुकली सोमवारी सकाळी एकटीच शाळेकडे निघाली होती. शिवोदयनगरमध्ये एका कारखान्याचे बंद पडलेले ट्रक रस्त्यावरच लावले होते. शेजारीच झुडपांना कवेत घेऊन विकृत मनोवृत्तीला आसरा देणारी एसटी महामंडळाची मोकळी जागा आहे. पस्तीशी पार केलेल्या एकाने अचानक या जागेचा फायदा घेऊन तिच्यावर झडप मारली. दलदलीतच तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. त्या मुलीने आरडाओरड केल्याने जवळच घरासमोर भांडी घासत बसलेल्या महिला तिच्या मदतीसाठी धावल्या आणि त्या विकृताने ट्रक व एसटीच्या जागेतील झुडपांचा आधार घेऊन पलायन केले.
त्या मुलीच्या छातीवर आणि चेहऱ्यावरच्या गंभीर जखमा तिला बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजावर घाव घालत होत्या. मुलीसह तिचे पालक व परिसरातील नागरिकही या घटनेने हादरले. त्या मुलीबाबत वाईट प्रत्येकालाच वाटत होते, परंतु काय करावे हे सुचत नव्हते. शेवटी त्या मुलीला घेऊन पालक व परिसरातील लोक विश्रामबाग पोलिसांत गेले. ठाण्यात बसलेल्या हृदयशून्य पोलिसांनी या मुलीला दिलेली वागणूक त्याहूनही भयानक होती. नाकाला कशी जखम झाली? तू कुठे होतीस? नंतर काय केलेस? अशा प्रश्नांनी तिला आणखी धक्का दिला. पालकांनाही याचे आश्चर्य वाटले. शेवटी पोलिसांसमोर काय बोलायचे म्हणून त्यांनी मौन बाळगले. अखेर डायरीला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
नेमकी कोणती घटना घडल्यानंतर ती दखलपात्र होते, असा प्रश्न मनात घेऊन सर्वजण परतले. पोलिसांच्या या वृत्तीचा धक्का सर्वांनाच बसला. शेवटी दूरध्वनीवरून पोलीसप्रमुखांना याची कल्पना देण्याचे सर्वांनी ठरविले आणि जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्यापर्यंत हा घटनाक्रम पोहोचला. प्रत्येक घटनेत पोलीसप्रमुखांनी लक्ष घातल्यानंतरच यंत्रणा हलणार असेल, तर ठाण्यांचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित झाला.



पोलीसप्रमुखांकडून दखल
पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी मंगळवारी पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांना चौकशीचे आदेश दिले. संबंधित मुलीस भेटून रेखाचित्र काढून संशयिताचा शोध घेण्याची सूचना त्यांनी दिली.

घाबरलेल्या त्या मुलीकडे विचारणा करून त्या व्यक्तीची माहिती काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिच्या पालकांनाही त्यात यश आले नाही. अशावेळी आरोपींप्रमाणे विचारल्या गेलेल्या पोलिसांच्या प्रश्नांनी तिची अवस्था आणखी बिघडली. महिला पोलिसाने तिची विचारपूस केली असती, तर त्याचा फायदा होऊ शकला असता. बळ कोणाला?

Web Title: A frightened tweezers or heartless police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.