Freedom slip on Khanapur-Atpadi corridor | खानापूर-आटपाडीच्या कोंडीवर अपक्षाचा उतारा

खानापूर-आटपाडीच्या कोंडीवर अपक्षाचा उतारा

श्रीनिवास नागे
शिराळ्यात सत्यजित देशमुखांनी भाजपप्रवेश केल्यानं तिथला काँग्रेस पक्षच संपला, तर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला खानापूर-आटपाडीत काँग्रेसला नेते-कार्यकर्ते शोधावे लागण्याची वेळ आलीय.
विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच पक्षाचं प्रदेश उपाध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून त्यांची वाटचाल काँग्रेसपासून फटकून, तर भाजपशी लगट करत सुरू असलेली दिसतेय. सदाभाऊ पाटील म्हणजे राजकारणातलं बडं प्रस्थ. विटा शहरावर यांचं वर्षानुवर्ष प्राबल्य. तिथल्या नगरपालिकेची सत्ता चाळीस वर्षे घरात. वडील आमदार होते, हेही २००४ मध्ये आमदार बनले. नंतर काँग्रेसचे सहयोगी आमदार होत थेट पक्षामध्ये गेले. २००९मध्ये पुन्हा आमदार झाले. पण काँग्रेस-राष्टÑवादीमधली गटबाजी उफाळून येत राहिली. काँग्रेसमधल्या कदम गटाचा आणि राष्टÑवादीतल्या आर. आर. पाटील गटाचा अनिल बाबर यांना पाठिंबा असायचा. बाबर म्हणजे सदाभाऊंचे कट्टर विरोधक.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ पाटील यांनी लाथाळ्यांना कंटाळून भाजपच्या संजयकाका पाटील यांच्या कमळाचा प्रचार केला. काकांना ‘लीड’ मिळालं आणि दोघांचा दोस्तानाही जमला! कदम आणि आर. आर. पाटील हे दोन्ही गट काकांचे विरोधक असल्यानं सदाभाऊ आणि काकांची दोस्ती गहरी बनली. विधानसभेला काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप, शिवसेना स्वतंत्र लढले. काँग्रेसकडून सदाभाऊ पाटील, राष्टÑवादीकडून आटपाडीचे अमरसिंह देशमुख, भाजपकडून गोपीचंद पडळकर, तर शिवसेनेकडून अनिल बाबर. बाबर यांनी निवडणुकीआधीच राष्टÑवादी सोडली होती. चौघांच्या मताची वाटणी झाली आणि बाबर निवडून आले. सदाभाऊंची पक्षात घुसमट सुरूच होती. शिवाय काकांशी हातमिळवणी झाली होती. अखेर त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामाच देऊन टाकला, पण पक्ष सदस्यत्व कायम होतं. नंतर ते अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच पक्षीय कार्यक्रमांत दिसले. पक्षानं मात्र ते आपल्यातच असल्याची समजूत करून घेतली.
आताच्या लोकसभेला संजयकाका आणि अनिल बाबर यांचं सूत जुळल्याचं सांगण्यात आलं. बाबर यांनी विधानसभेची गणित जुळवण्यासाठी काकांचा प्रचार केला. त्यांची शिवसेनेपेक्षा भाजपशी जास्त जवळीक वाढली.
सदाभाऊंच्या भूमिकेबाबत मात्र संभ्रम कायम राहिला. त्यांनी लोकसभेला नेमका कोणाला हात दिला, हे गुलदस्त्यातच राहिलं. ही मुरब्बी राजकारण्याची खेळी होती. त्यामुळंच भाजपला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे गोपीचंद पडळकर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आणि संजयकाकांच्या साक्षीनं मुख्यमंत्री त्यांना मुंबईत बोलावू लागले! आटपाडीच्या देशमुख गटाशीही त्यांच्या चर्चेच्या फेऱ्या होऊ लागल्या. विशेष म्हणजे सदाभाऊंनी काँग्रेसच्या नेत्यांनाही तेवढ्याच अंतरावर ठेवलंय.
काँग्रेसची पडझड होत असताना राजकीय अपरिहार्यता ओळखून सदाभाऊंनी काँग्रेसचं तिकीट मागितलं नाही आणि नको म्हणूनही सांगितलं नाही! काँगे्रसकडून लढण्यापेक्षा अपक्ष म्हणून लढण्याकडं त्यांचा कल जास्त दिसतोय... देशमुख गटाच्या भाजपमध्ये जाण्यानं राष्टÑवादीही पुरती संपून गेलीय. काँग्रेससारखीच ती कशीबशी तग धरून आहे.
जाता-जाता : खानापूर मतदारसंघ तीन भागांमध्ये वाटला गेलाय. खानापूर आणि आटपाडी हे दोन तालुके, अधिक तासगाव तालुक्यातली एकवीस गावं. ग्रामीण भागात अनिल बाबर यांचा यांचा वट कायम राहिलाय. आता मात्र समीकरणांची उलथापालथ होत असताना त्यांची जिरवण्यासाठी विरोधक एकत्र येताहेत. पण मैदानात नेमकं कोण उतरणार, हेच ठरलेलं नाही. सदाभाऊ, पडळकर आणि देशमुख एकत्र आले तर बाजी उलटवू शकतात, हे तिघांनाही माहीत आहे... आणि हेच या कोंडीचं कारण बनलंय. लोकसभेला ताकद दाखवल्यानंतर गोपीचंद पडळकर आता विधानसभेलाही उतरताहेत. तशी घोषणाच त्यांनी केलीय. पण कोठून, हे अद्याप स्पष्ट नाही, तर अमरसिंह देशमुखांनीही भाजप-शिवसेना युतीला फाट्यावर मारत ‘कोणी थांबायचं हे ठरवावं लागंल’ असं सांगत शड्डू ठोकलाय. बाबरविरोधकांतल्या कुठल्या पैलवानाच्या अंगाला तेल लागणार, की सगळेच लांग चढवणार, हेच समजत नाही.
ताजा कलम : युती-आघाडी होणार की नाही, याकडं सर्वाधिक लक्ष याच मतदारसंघाचं लागलंय. भाजप-शिवसेना स्वतंत्र लढले तर सदाभाऊ भाजपचेही उमेदवार होऊ शकतात, हे जाणून बाबर यांनी भाजपला हाताशी धरलंय. युती झाली तर सदाभाऊ अपक्ष म्हणून लढावेत आणि त्यांना पडळकर-देशमुखांची मदत देऊन, आपलीही रसद पुरवायची. मग नंतर आपल्या तंबूत घ्यायचं, अशीही खेळी भाजप खेळेल... त्यांचा काय नेम!

Web Title: Freedom slip on Khanapur-Atpadi corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.