देशाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:12+5:302021-03-31T04:27:12+5:30
विटा : भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसेनानींनी आपले प्राणार्पण केले. ...

देशाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे
विटा : भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसेनानींनी आपले प्राणार्पण केले. ते आजच्या पिढीने विसरता कामा नये. भारत देशाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, याचेही आपण भान ठेवले पाहिजे, असे मत प्रसिध्द विधीज्ञ अॅड. शौर्या पवार यांनी व्यक्त केले.
विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' निमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात अॅड. सौ. पवार बोलत होत्या. यावेळी माजी आ. सदाशिवराव पाटील, अध्यक्ष अॅड. वैभव पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, प्राचार्य विजय हवालदार उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य विजय हवालदार यांनी प्रास्ताविकात भारतीय स्वातंत्र्याला सन २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतीय शिक्षण मंत्रालयाने २०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर ७५ आठवडे व २०२३ च्या स्वातंत्र्यदिनापर्यंत 'आजादी का अमृत महोत्सव' हा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यास अनुसरून आदर्श फार्मसी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी अॅड. शौर्या पवार यांनी विविध कायद्याच्या तरतुदी सांगून महाविद्यालयीन युवक-युवतींना अॅँटी रॅगिंग कायद्याची माहिती दिली. पूजा निकम यांनी सूत्रसंचलन तर प्रा. निलम जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.