सरकारी रुग्णालयात मोफत, खासगीमध्ये २५० रुपयांत लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST2021-03-01T04:30:07+5:302021-03-01T04:30:07+5:30

सांगली : आज, सोमवारपासून साठ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण जिल्ह्यात सुरू होत आहे. रविवारी दिवसभर आरोग्य विभागात त्याची पूर्वतयारी ...

Free vaccination at government hospital, Rs. 250 at private | सरकारी रुग्णालयात मोफत, खासगीमध्ये २५० रुपयांत लसीकरण

सरकारी रुग्णालयात मोफत, खासगीमध्ये २५० रुपयांत लसीकरण

सांगली : आज, सोमवारपासून साठ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण जिल्ह्यात सुरू होत आहे. रविवारी दिवसभर आरोग्य विभागात त्याची पूर्वतयारी सुरू होती.

राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने शासनाने ज्येष्ठांच्या लसीकरणाचा तातडीचा निर्णय घेतला. त्यानुसार साठ वर्षांवरील सर्व नागरिकांना व व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयात मोफत व खासगीमध्ये २५० रुपयांत लस मिळेल.

सांगलीत सर्व शासकीय रुग्णालये व महापालिका आरोग्य केंद्रांत लस टोचली जाईल. जिल्ह्यात सध्या ४६ हून अधिक रुग्णालयांत कोरोनाचे लसीकरण सुरू आहे, त्यामध्ये सांगली व मिरज सिव्हिल, सर्व ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. त्याशिवाय खासगी २७ रुग्णालयांतही लस मिळेल. आयुष्मान योजनेशी जोडलेली सर्व खासगी रुग्णालये लसीकरण केंद्रे म्हणून जाहीर झाली आहेत.

लसीकरणासाठी पूर्वनोंदणी करावी लागेल. ४५ ते ५९ वर्षांच्या व जोखमीचा आजार असलेल्या नागरिकांनाही लस मिळेल. जिल्हा परिषदेकडे सध्या शिल्लक असलेले डोस त्यासाठी वापरले जातील.

चौकट

तीन प्रकारे होईल नोंदणी

लसीकरणासाठी सेतू ॲप किंवा को-विन २.० ॲपवरून नोंदणी करावी लागेल. त्यामध्ये लसीकरणाचे केंद्र निवडावे लागेल. नोंदणीनंतर मोबाईलवर मेसेज मिळेल, त्यामध्ये लसीकरणाची तारीख व वेळ असेल. देशभरात कोठेही नोंदणी व लसीकरण करून घेता येईल. लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येईल. लाभार्थ्याला पुराव्याच्या स्वरूपात आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा कोणतेही सचित्र शासनमान्य ओळखपत्र द्यावे लागेल. ४५ ते ५९ वर्षांच्या व्यक्तींना व्याधी असेल तर डॉक्टरांचे तसे प्रमाणपण सादर करावे लागेल. त्यानंतर जागेवरच लस टोचली जाईल. एक मोबाईल क्रमांक चौघांसाठी वापरता येईल; पण प्रत्येकाचा ओळखपत्र क्रमांक वेगवेगळा हवा.

चौकट

येथे मिळणार कोरोना लस

सरकारी रुग्णालये - सांगली सिव्हिल, मिरज सिव्हिल, सर्व उपजिल्हा, सर्व ग्रामीण, कवलापूर, म्हैसाळ, खंडेराजुरी आरोग्य केेंद्रे, महापालिकेची १० आरोग्य केंद्रे.

खासगी रुग्णालये - वॉनलेस, भारती, सेवासदन, सिद्धिविनायक कर्करोग, लायन्स नॅब (सर्व मिरज), प्रकाश इस्लामपूर, इत्यादी २७ खासगी रुग्णालये.

चौकट

यांना मिळेल लस

साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना लस मिळेल. ४५ ते ५९ वर्षे वयाचे नागरिक व्याधिग्रस्त असतील तर त्यांनाही लस मिळेल. मात्र व्याधिग्रस्त असल्याचे सक्षम डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. केंद्रावर जाऊन नोंदणी केल्यानंतर जागेवरच लस टोचली जाईल.

चौकट

अद्याप सहा हजार जणांचे लसीकरण बाकी

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी आरोग्य विभाग व शासकीय अशा २९ हजार ४०० कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यांतील २२ हजार कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली. अद्याप सात हजार जणांचे लसीकरण बाकी आहे. काही आरोग्य कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणही यापूर्वीच सुरू झाले आहे. राहिलेले सर्व कर्मचारी आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या नव्या मोहिमेत सहभागी होऊ शकतील. ते कोणत्याही शासकीय अथवा खासगी केंद्रात जाऊन लस टोचून घेऊ शकतील.

Web Title: Free vaccination at government hospital, Rs. 250 at private

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.