म्युकरमायकोसिसवर जनआरोग्यमधून मोफत उपचार म्हणजे शुद्ध धूळफेकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:18+5:302021-05-22T04:24:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनातून बाहेर पडेपर्यंत दमछाक झालेल्या रुग्णांवर आता म्युकरमायकोसिसचे संकट घोंगावत आहे. या आजारात रुग्णाचा ...

Free treatment from public health for mucomycosis is pure dusting | म्युकरमायकोसिसवर जनआरोग्यमधून मोफत उपचार म्हणजे शुद्ध धूळफेकच

म्युकरमायकोसिसवर जनआरोग्यमधून मोफत उपचार म्हणजे शुद्ध धूळफेकच

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनातून बाहेर पडेपर्यंत दमछाक झालेल्या रुग्णांवर आता म्युकरमायकोसिसचे संकट घोंगावत आहे. या आजारात रुग्णाचा मृत्यू होत नसला तरी उपचारांचा खर्च प्राण कंठाशी आणणारा आहे. शासनाने संपूर्ण उपचार जनआरोग्य योजनेतून विनाशुल्क जाहीर केले असले तरी ती शुद्ध धूळफेक ठरणार आहे.

म्युकरमायकोसिसचा उपचार व औषधांचा खर्च १० ते १५ लाखांपर्यंत जातो; पण जनआरोग्यची मर्यादा दीड लाखापर्यंतच आहे, त्यामुळे शासनाची मदत अत्यंत तुटपुंजी ठरेल. सर्वसामान्य रुग्णांनी आयुष्यभराची पुंजी गोळा केली तरी त्यातून म्युकरमायकोसिसचा खर्च भागणार नाही हे स्पष्ट आहे. सध्या कोरोनाग्रस्तांवर फुले योजनेतून उपचार होतात, त्यातून अनेक रुग्णांना फक्त २० ते ४० हजार रुपयांचीच मदत मिळत आहे. पॅकेज संपल्याचे सांगत अतिरिक्त बिल नातेवाइकांनाच भरण्यास सांगितले जाते. योजनेच्या तांत्रिक बाबी माहिती नसणारे रुग्णाचे नातेवाईक मुकाटपणे पैसे भरतात.

पहिल्या टप्प्याचे पॅकेज संपल्यानंतर नव्या पॅकेजचा प्रस्ताव पाठविण्याचे काम संबंधित रुग्णालयाने किंवा तेथील रुग्णमित्राने करायचे असते; पण दोहोंकडून प्रामाणिकपणे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. म्युकरमायकोसिसवरील उपचारांबाबतही हीच स्थिती ओढावण्याची भीती आहे. अर्थात, या आजारासाठी पुरेसे पॅॅकेज घेतल्यास खिशातून पैसे भरावे लागणार नाहीत असा दावा योजनेच्या प्रवक्त्यांनी केला.

चौकट

अैाषधे मोफत नावालाच

- म्युकरमायकोसिससाठीची इंजेक्शन्स महागडी आहेत, शिवाय रुग्णाच्या अवस्थेनुसार १४ ते ४० इंजेक्शन्स द्यावी लागतात. हा खर्च सुमारे अडीच ते तीन लाखांपर्यंत जातो. त्याशिवाय अन्य औषधेही मोठ्या प्रमाणात लागतात.

- महात्मा फुले योजनेतून म्युकरमायकोसिसवर उपचार मोफत होत असले तरी त्यासाठीची अत्यंत महागडी इंजेक्शन्स रुग्णालयात उपलब्ध नाहीत. ती नेहमी लागत नसल्याने औषध विक्रेतेदेखील साठा करून ठेवत नाहीत. या स्थितीत इंजेक्शन्स उपलब्ध करण्याची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाइकांवरच टाकली जाते.

- नातेवाइकांनी बाहेरून विकत आणल्याने इंजेक्शन्सचा खर्च योजनेत धरला जात नाही. त्यांच्या खिशातूनच पैसे जातात. हा खर्च तीन लाखांपासून दहा-पंधरा लाखांपर्यंत असू शकतो.

पॉइंटर्स

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण - ७०

म्युकरमायकोसिसचे एकूण मृत्यू - १

कोट

लाखो रुपये आणायचे कोठून?

कोरोनातून बरे होण्यासाठी लाख-दीड लाखांचा खर्च केला. आता म्युकरमायकोसिससाठी आणखी पाच-सात लाख रुपये आणायचे कोठून, ही चिंता भेडसावते आहे. महात्मा फुले योजनेतून उपचार मोफत झाल्यास दिलासा मिळेल.

- राजेंद्र काळे, रुग्णाचे नातेवाईक

म्युकरमायकोसिससाठी इंजेक्शन्स मिळविणे म्हणजे मोठे दिव्य आहे. त्याच्या खर्चाचे आकडे ऐकूनच चिंता वाटत आहे. शासनाने महात्मा फुले योजनेतून इंजेक्शन्ससह संपूर्ण खर्च करायला हवा.

- जालिंदर हेगडे, रुग्णाचे नातेवाईक.

Web Title: Free treatment from public health for mucomycosis is pure dusting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.