गोमेवाडीत एका संस्थेकडून ठेवीच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:10+5:302021-09-15T04:31:10+5:30

आटपाडी : गोमेवाडी (ता. आटपाडी) परिसरामध्ये एका संस्थेचा पदाधिकारी ठेवीदारांना खोटी आश्वासने देऊन गंडा घालत असल्याचा प्रकार चालू ...

Fraud in the name of deposit from an institution in Gomewadi | गोमेवाडीत एका संस्थेकडून ठेवीच्या नावाखाली फसवणूक

गोमेवाडीत एका संस्थेकडून ठेवीच्या नावाखाली फसवणूक

आटपाडी : गोमेवाडी (ता. आटपाडी) परिसरामध्ये एका संस्थेचा पदाधिकारी ठेवीदारांना खोटी आश्वासने देऊन गंडा घालत असल्याचा प्रकार चालू आहे. नागरिकांनी लाखो रुपयांचा गंडा बसण्यापूर्वीच सावध होण्याची गरज आहे. तसेच संबंधित भुरट्या व्यक्तीवरही प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक संघटनांमधून होत आहे.

अधिक माहिती अशी की, गोमेवाडी परिवारातील हिवतड येथील एका स्वयंरोजगार संस्थेने आपल्या वर्धापन दिनानिमित्त एजीएसच्या नावाखाली नागरिकांकडून ठेवी स्वीकारण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये दरमहा ते वार्षिक ठेवी स्वीकारत आहेत. दामदुप्पट सहा वर्षात देणार असल्याचे सांगत ठेवी घेतल्या जात आहेत. यासह एजीएस रेशन धान्यही दिले जात आहे. यासाठी तीन हजार ५००, सात हजार, दहा हजार ५०० इतकी रक्कम आकारली जात आहे. दरम्यान, या सर्व योजनांच्या माध्यमातून ज्यांना शासकीय धान्य मिळत नाही, असे नागरिक या संस्थेच्या आमिषाला बळी पडत गुंतवणूक करत आहेत.

‘लोकमत’ने यापूर्वी याच संस्थेमार्फत सुरू असलेल्या अनेक फसव्या जाहिरातींबाबत आवाज उठवत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. यावेळी तहसीलदार यांनी कारवाई करण्याच्या इशारा दिल्याने अनेक महिने कोणतीही जाहिरात केली गेली नाही. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियातून पुन्हा जाहिरातबाजी करत, अनेक कारनामे केले जात आहेत. अनेक गोरगरीब नागरिकांच्या घामाचा पैसा गुंतवणूक म्हणून घेतला जात असून, परताव्याबाबत कोणतीही शास्वती नाही. पैसे गुंतवणूक करत असताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.

चौकट

संस्थेची पात्रता तपासूनच ठेवी ठेवा : बी. डी. मोहिते

नागरिकांनी आपले पैसे गुंतवणूक करताना संस्थेकडे ठेवी घेण्याचे प्रमाणपत्र आहे का? संस्थेची सत्यताही पडताळणी करण्याची गरज आहे. गुंतवणूक पात्रता तपासूनच संस्थेसंबंधी व्यवहार करावेत. संबंधित संस्थेकडून फसवणूक झाल्यास शासन जबाबदार नाही, अशी माहिती आटपाडीचे सहायक निबंधक श्रेणी एक बी. डी. मोहिते यांनी दिली.

Web Title: Fraud in the name of deposit from an institution in Gomewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.