मिरजेत गॅस्ट्रोने घेतला चौथा बळी
By Admin | Updated: November 23, 2014 23:52 IST2014-11-23T23:34:48+5:302014-11-23T23:52:32+5:30
वृद्धेचा मृत्यू : आणखी ३७ रुग्ण दाखल

मिरजेत गॅस्ट्रोने घेतला चौथा बळी
मिरज : मिरजेत गॅस्ट्रोच्या साथीमुळे सुहासिनी भालचंद्र जोग (वय ७०) या वृद्धेचा आज, रविवारी मृत्यू झाला. गॅस्ट्रोमुळे चार दिवसांत चौघांचा बळी गेला असून, जिल्हाधिकारी, आरोग्य उपसंचालकांनी आज मिरजेत रुग्णांची पाहणी केली. महापालिका आरोग्य विभागाने गॅस्ट्रोची साथ आटोक्यात असल्याचा दावा केला; मात्र आज आणखी ३७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
मिरजेत गेला आठवडाभर गॅस्ट्रो व कॉलरा साथींची सुमारे तीनशे जणांना लागण झाली आहे. जुलाब व उलट्यांमुळे तिघांचा मृत्यू झाला असून, आज ब्राह्मणपुरीतील सुहासिनी जोग यांचा मूत्यू झाला. जोग या घरी एकट्याच राहत होत्या. उलट्या व जुलाबामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मात्र महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जोग यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले. आजही उलट्या व जुलाबाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल झाले. गॅस्ट्रोबाधित रुग्णांची संख्या मोठी असल्याने महापालिका प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वैद्यकतज्ज्ञांना मदतीसाठी पाचारण केले आहे. जिल्हा परिषद व वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकतज्ज्ञांकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, आरोग्य उपसंचालक डॉ. मुगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दळवी यांनी मिरजेत गॅस्ट्रोबाधित रुग्णांची पाहणी करून साथ नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शहरात दूषित पाण्याचा पुरवठा बंद करण्यासाठी पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाने जलवाहिन्यांच्या स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. ब्राह्मणपुरीतील मुख्य जलवाहिन्यांतील दूषित पाणी काढण्यात येत होते. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उद्या, सोमवारी त्या पाण्याच्या शुद्धतेचा अहवाल मिळणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी सांगितले. ब्राह्मणपुरी परिसरात गॅस्ट्रो साथीची तीव्रता जास्त आहे. या परिसरातील दोन वृद्धांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
अफवांमुळे गोंधळ
गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात नसल्याने पाणीपुरवठ्याबाबत शहरात वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी तेथे धाव घेतली. मात्र, असा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले. दूषित पाण्यामुळे बाटली बंद पाण्याला मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने बाटली बंद पाण्याचे दर वाढले आहेत.