कडेगावमध्ये रस्ता चौपदरीकरणाचे काम ठप्प!

By Admin | Updated: February 13, 2015 00:50 IST2015-02-13T00:21:37+5:302015-02-13T00:50:13+5:30

ठेकेदार बदलण्याच्या मागणीला जोर : दंडात्मक कारवाईनंतर काम संथगतीने

Four-way road work in Jataghat! | कडेगावमध्ये रस्ता चौपदरीकरणाचे काम ठप्प!

कडेगावमध्ये रस्ता चौपदरीकरणाचे काम ठप्प!

प्रताप महाडिक - कडेगाव येथील कऱ्हाड-विटा रस्ता रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई झाली आहे. तरीसुद्धा कामात अपेक्षित प्रगती नाही. बहुतांशी कामे सध्या ठप्पच झाली आहेत. अशा संथगतीने हे काम होणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने आता ठेकेदारच बदलावा, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरीत आहे.
कडेगाव येथील कऱ्हाड-विटा रस्ता रुंदीकरण आणि चौपदरीकरण कामासाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीतून महालक्ष्मी मंदिर ते डोंगराई मंदिरादरम्यानच्या ११०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्याची रुंदी २५ मीटर असून, ९.२० मीटर रुंदीचा दुभाजक होणार आहे. त्यामध्ये स्ट्रिट लाईट बसविण्यात येणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी २ मीटर लांबीचा पदपथ होणार आहे. तसेच वाहन पार्किंग सुविधा होणार आहे. हे काम कडेगावच्या वैभवात भर घालणार आहे. यामुळे आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी विशेष लक्ष घालून जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ३ डिसेंबर २०१३ रोजी या कामास प्रारंभ केला. परंतु हे काम करणाऱ्या ठेकेदाराने प्रारंभापासून संथगतीने काम सुरु केले आहे.
३ डिसेंबर १३ ते २ डिसेंबर २०१४ या वर्षभराच्या कालावधित हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु विहित वेळेत केवळ २० टक्के काम पूर्ण झाले. सुरुवातीपासूनच काम रखडत चालले होते. याबाबत संबंधित ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या होत्या. तरीही ठेकेदाराच्या कारभारात सुधारणा झाली नाही. म्हणून १५ जुलै २०१४ पासून संबंधित ठेकेदाराला प्रतिदिन २००० रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली. तरीही कामाची स्थिती आजही ‘जैसे थे’च दिसते. इतक्या संथगतीने काम पूर्ण होणे अशक्य आहे. यामुळे आता पतंगराव कदम यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांचेही ठेकेदाराच्या कारभाराकडे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी आहेत.
कदम यांनी हा ठेकेदार बदलून नवीन ठेकेदारांमार्फत हे काम पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. कडेगाव येथील उपविभागीय अभियंता सुभाष पाटील यांनीही बांधकाम विभागाच्या कोल्हापूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे, हे काम अधिकच रखडत चालले आहे.
संबंधित ठेकेदारावर नियमानुसार आता प्रतिदिन १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, असा प्रस्ताव दिला आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे समजते. याशिवाय पंचायत समिती, कडेगाव येथील मासिक बैठकीतही ठेकेदार बदला, अशीच मागणी सदस्यांतून होत आहे.

ठेकेदाराला प्रतिदिन दोन हजाराचा दंड
ठेकेदाराला नोटीस देऊनही त्याच्या कारभारात सुधारणा झाली नाही. म्हणून १५ जुलै २०१४ पासून संबंधित ठेकेदारावर प्रतिदिन २००० रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली. तरीही कामाची स्थिती आजही ‘जैसे थे’च दिसते.
कडेगावातील रस्त्याचे चौपदरीकरण होतेय, त्यामुळे कडेगाव शहराच्या वैभवात भर पडणार आहे. वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांनी रस्त्याकडेचे अतिक्रमण काढून घेतले. अनेक खोकीधारकांनी रोजीरोटी देणारे आपले व्यवसाय अन्यत्र हलविले. ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेते, सर्वांचेच सर्वतोपरी सहकार्य असतानाही काम रखडल्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी आहे.

Web Title: Four-way road work in Jataghat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.