चार पाणी योजना पडल्या बंद
By Admin | Updated: November 17, 2014 23:23 IST2014-11-17T22:25:45+5:302014-11-17T23:23:28+5:30
नागरिकांचे हाल : साडेअकरा कोटींचे वीज बिल थकित

चार पाणी योजना पडल्या बंद
शिरढोण/विसापूर : कवठेमहांकाळ, विसापूर व मणेराजुरी, येळावी या पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजनांचे ११ कोटी ५५ लाखांचे वीज बिल थकल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला असून, या योजनेतील गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
या वीज बिलामुळे शुक्रवार दि. १४ पासून गेले पाच दिवस सध्या पाणी पुरवठा बंद आहे. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, मळणगाव, जायगव्हाण, लांडगेवाडी, कवठेमहांकाळ, जाधववाडी, शेळकेवाडी, विठुरायाचीवाडी, देशिंग, झुरेवाडी, जाखापूर, आगळगाव या प्रादेशिकमधील गावांचा समावेश असून, विसापूरमधील विसापूर, गोटेवाडी, तुरची, ढवळी तसेच अशी १५ गावे कवठेमहांकाळ विसापूर या योजनेमधील आहेत.
मणेराजुरी - येळावीमधील मणेराजुरी, उपळावी, कुमठे, काकडवाडी, करोली (एम), सोनी, सावर्डे, नागाव, मतकुणकी, कौलगे, वाघापूर, खुसगाव, बस्तवडे, भैरववाडी, पुणदी, योगेवाडी, धुळगाव आदींसह २२ गावे या योजनेत समाविष्ट आहेत. तसेच येळावीमधील येळावीसह नेहरूनगर निमणी, नागाव, बेंद्री, हजारवाडी, जुळेवाडी व भिलवडी स्टेशन अशी प्रादेशिक योजनेमधील गावांची नावे आहेत.
या पाणी पुरवठ्यावर महिन्याला २५ ते २७ लाख रुपये वीज बिल, तसेच या योजनेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार, लिकेज आदीवर खर्च होत आहे. तसेच या योजनेचे वार्षिक सुमारे एक कोटीचे डिमांड आहे. सध्या प्रादेशिक योजनेची ११ कोटी ५५ लाख वीज बिल थकबाकी आहे.
या थकबाकीपैकी २७ लाख १० हजारांचा धनादेश तासगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काढला आहे. परंतु वीज वितरण कंपनीने थकबाकी भरण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे सध्या या गावांतील ग्रामपंचायतीकडे या प्रादेशिक योजनेची बरीच रक्कम थकबाकीच्या स्वरुपात आहे. ती अद्याप वसूल नाही. त्यामुळे या योजनेला पैसे भरणे कठीण होत आहे.
वीज कनेक्शन बंद केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला असून, हे वीज कनेक्शन सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. या योजनेची थकबाकी वसूल झाले तरच ही योजना सुरू होईल, अन्यथा योजना बंद राहून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. (वार्ताहर)
विहिरी, कूपनलिकांचा आश्रय
सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. यामुळे विसापूर परिसरातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी सात दिवसांपासून भटकंती सुरू आहे. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. ग्रामस्थांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका, आड तसेच खासगी विहिरींच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. आड व विहिरी यांना बरेच दिवस उपसा नसल्याने तसेच कूपनलिकांचेही पाणी दूषित असल्यामुळे अस्वच्छता व दूषित पाणी यामुळे विविध साथींचे रुग्ण वाढत आहेत. आड, विहिरी व कूपनलिकांचे दूषित पाणी नाईलाजाने प्यावे लागत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारले असता, त्यांनी संपूर्ण रक्कम भरली असल्याचे सांगण्यात आले. परंतु कवठेमहांकाळ, मणेराजुरी, येळावी या योजनांची थकबाकी असल्याने महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. विसापूर परिसराची थकबाकी नसून देखील प्रादेशिक योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी, पंचायत समितीने तोडगा काढून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.