शिराळ्यात चार गावांनी कोरोनाला ठेवले दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST2021-04-06T04:24:50+5:302021-04-06T04:24:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील सुमारे ४० हजारहून अधिक नागरिक मुंबईत वास्तव्यास आहेत. गतवेळी लॉकडाऊनच्या ...

शिराळ्यात चार गावांनी कोरोनाला ठेवले दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील सुमारे ४० हजारहून अधिक नागरिक मुंबईत वास्तव्यास आहेत. गतवेळी लॉकडाऊनच्या काळात ते आपल्या घरी आले होते. सर्वत्र कोरोनाने हाहाकार होता तरीही तालुक्यातील चार गावे व एका वाडीमध्ये योग्य नियोजन केल्याने कोरोनाला प्रवेश करू दिला नाही. सध्याही हीच दक्षता घेतली जात आहे, त्यामुळे कोरोना गावाबाहेर राहिला आहे.
शिवरवाडी, कुसलेवाडी, खुंदलापूर, माणेवाडी ही चार गावे आणि आरळा ग्रामपंचायतीअंतर्गत बेरडेवाडी या ठिकाणी कोरोनाला गावाबाहेर रोखण्यात यश आले आहे.
शिवरवाडीची लोकसंख्या ५६० असून, १०० च्या दरम्यान नागरिक मुंबईसह अन्य ठिकाणाहून आले होते. यावेळी येथील युवकांनी आठ-आठ तासांची ड्यूटी लावून गावभोवती खडा पहारा ठेवला होता. ५० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात आली. कुसलेवाडी गावाची लोकसंख्या ७५० असून, सुमारे ४० नागरिक मुंबईहून आले होते. खुंदलापूर गावाची लोकसंख्या ३४० असून, १५० नागरिक मुंबईहून आले होते.
माणेवाडी येथील लोकसंख्या ७०० असून २०० च्या दरम्यान नागरिक मुंबईहून आले होते. यांच्यासाठी ९ शेड, ग्रामपंचायतची एक खोली, जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यामध्ये संस्था अलगीकरण कक्ष तयार केले होते. बेरडेवाडीची लोकसंख्या ७३४ असून, येथे १५० नागरिक मुंबईहून आले होते.
कोट
प्रशासन, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका आणि युवकांचे प्रशासनास मोठे सहकार्य मिळाले. गावामध्ये वेळोवेळी औषध फवारणी, प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणे, याचबरोबर गावात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर युवकांचा २४ तास पहारा होता. गावच्या बाहेरच नागरिकांची नोंद ठेवणे. त्यांना संस्था विलगीकरण कक्षात ठेवणे, एवढेच नव्हे, तर त्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था करणे याचीही जबाबदारी पार पाडली.
- लक्ष्मी देसाई - सरपंच, शिवरवाडी
कोट
बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांसाठी नऊ शेड, ग्रामपंचायतची एक खोली, जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यामध्ये संस्था अलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. या सर्वांची नोंद व त्यांची तपासणी करण्यात येत होती.
खसुदाम गजरे - ग्रामसेवक, शिवरवाडी