चार जागांमध्ये अडले बिनविरोधचे घोडे
By Admin | Updated: May 12, 2016 00:15 IST2016-05-11T22:53:05+5:302016-05-12T00:15:26+5:30
वसंतदादा कारखाना निवडणूक : विशाल पाटील बिनविरोध; १८ उमेदवारांनी घेतली माघार

चार जागांमध्ये अडले बिनविरोधचे घोडे
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीचे घोडे केवळ चार जागांमुळे अडले आहे. सत्ताधारी गटाने प्रयत्न केल्यानंतरही अनेकांनी हटवादी भूमिका स्वीकारल्याने निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. उत्पादक गटातून कारखाना अध्यक्ष विशाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून अन्य गटातील उमेदवारांची यादी त्यांनी बुधवारी जाहीर केली. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. कारखाना कार्यक्षेत्र चार तालुक्यांतील १६२ गावांमध्ये विखुरलेले आहे. सर्व गावांमधील कारखान्याच्या व्यक्ती उत्पादक सभासदांचा एक मतदारसंघ, याप्रमाणे पाच गट तयार केले आहेत. या पाच गटातून प्रत्येकी तीन, याप्रमाणे १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यानंतर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक व पणन संस्था मतदार संघ क्र. २ मधून १, अनुसूचित जाती, जमातीतून १, महिला २, इतर मागासवर्गीय १, भटक्या विमुक्त, विशेष मागास प्रवर्गामधून १, असे संचालक निवडून द्यायचे आहेत.
चार जागांसाठी अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांच्या प्रयत्नात सत्ताधारी गटास १७ जागांवर बिनविरोधची चर्चा यशस्वी करता आली. अद्याप काही जागांवर घोडे अडले आहे. (प्रतिनिधी)
उमेदवारी अर्ज : १८ जणांची माघार
बुधवारी एकूण १८ उमेदवारांनी माघार घेतली. उत्पादक गटातून लक्ष्मण घारगे, आदिनाथ मगदूम, माणिक पाटील, अविराजे शिंदे, जनार्दन पाटील, संभाजी पाटील, दिलीप पवार, सुरेश पाटील, उमेश पाटील, गणेश पाटील यांनी, अनुसूचित जाती गटातून प्रकाश कांबळे, रामचंद्र मोरे, शामराव ढोबळे यांनी, महिला गटातून जयश्री पाटील यांनी, तर भटक्या जाती गटातून सचिन कोळी यांनी माघार घेतली.