खूनप्रकरणी चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:47+5:302021-09-11T04:26:47+5:30
शिराळा : प्रेमप्रकरणातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी चौघा संशयितांना शिराळा प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. शिवतेज विनायक घाटगे ...

खूनप्रकरणी चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
शिराळा : प्रेमप्रकरणातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी चौघा संशयितांना शिराळा प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. शिवतेज विनायक घाटगे (रा. सातवे, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव असून, भाऊसाहेब बाजीराव दळवी, पतंग विकासराव दळवी, सौरभ भाऊसाहेब दळवी, अजय विजय दळवी (रा. सर्व सातवे) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत दीपक यशवंत हांडे (रा. सातवे) यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली होती.
दीपक हांडे त्यांची फकिरवाडी येथे विकलेली म्हैस सोडण्यासाठी शिवतेजसोबत त्याच्या चुलत्यांचा टेम्पो घेऊन जात होते. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी मुलगी पळवून नेल्याचा राग मनात धरून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मांगले-कांदे रोडवर सावर्डे फाटा येथे शिवतेजला मारहाण केली. त्या ठिकाणाहून त्यास दुचाकीवरून दुसरीकडे नेऊन पुन्हा विवस्त्र करीत जबर मारहाण केली होती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्यासुमारास घडली होती. कोडोली पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याची प्रकृती चांगली होती. मध्यरात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात हलवले; पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुरुवारी रात्री चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी चौघांना शिराळा न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले.