चार अधिकाऱ्यांना परत पाठविणार
By Admin | Updated: February 26, 2015 00:07 IST2015-02-25T23:48:54+5:302015-02-26T00:07:28+5:30
महापालिका सभेत ठराव : आणखी काही अधिकाऱ्यांबाबत निर्णय होणार

चार अधिकाऱ्यांना परत पाठविणार
सांगली : प्रतिनियुक्तीवर आलेल्या राज्य शासनाच्या चार अधिकाऱ्यांना पुन्हा शासन सेवेत परत पाठविण्याचा ठराव बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यामध्ये पाणीपुरवठा अधिकारी जनार्दन गिरी, मुख्य लेखापरीक्षक एन. व्ही. कोंगळे, नगररचनाकार संचालक एस. के. साळवी, जलनिस्सारण अभियंता संजय कुलकर्णी यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा विभागासह अन्य विभागांतील आणखी काही अधिकाऱ्यांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे महापौर विवेक कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या प्रश्नोत्तरावेळी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या विषयावर चर्चा झाली. नगरसेवक सुरेश आवटी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला. जे अधिकारी महापालिकेचे काम करीत नसतील आणि त्यांना विनाकारण पोसण्याची वेळ महापालिकेवर येत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना पुन्हा शासनाच्या सेवेत परत पाठविण्यात यावे, अशी मागणी आवटी यांच्यासह शेखर माने यांनी केली. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी या विषयावर सभेपूर्वीच टीका केली होती. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत पाठविण्याची मागणी त्यांनीही केली होती. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी या ठरावाला एकमताने संमती दर्शविली. महापौरांनी याबाबतचा ठराव करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात चार अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना कांबळे म्हणाले की, महापालिकेच्या बिनकामाच्या अधिकाऱ्यांना आम्ही शासनाकडे परत पाठविण्याची भूमिका घेतली आहे.
आपल्या अधिकाऱ्यांना संधी द्या!
ज्या अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठविले जाणार आहे, त्यांच्या जागेवर महापालिकेचे जे पात्र अधिकारी आहेत, त्यांच्या नियुक्तीबाबत प्राधान्याने विचार केला जावा, अशी मागणी सुरेश आवटी यांनी महापौरांकडे केली. त्याबाबतही आयुक्तांशी चर्चा करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी करणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.