देवराष्ट्रे (जि. सांगली) : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या कुंपणाशेजारी चार हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हरणांचा मृत्यू होऊन काही दिवस उलटल्यानंतर एकाच दिवशी हरणांचे मृतदेह सापडल्याने वन्यजीव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सातत्याने होणाऱ्या हरणांच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यावर वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींतून होत आहे.सागरेश्वर अभयारण्याच्या आसद, मोहिते-वडगाव हद्दीच्या बाजूला चितळ जातीच्या चार हरणांचा मृत्यू झाला आहे. हरणांचा मृत्यू होऊन काही दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर सडलेल्या अवस्थेत हरणांचे मृतदेह आढळले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर जाग आली. यानंतर प्रादेशिक वन विभागाच्या कडेगाव येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. प्रादेशिकचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केल्यावर मृतदेह कडेगाव येथे नेण्यात आले.
याबाबत कडेगावचे प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसटवार यांनी सांगितले की, यातील काही हरणांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. त्या हरणांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत होते. हरणांचा मृत्यू कुत्र्याने पाठलाग केल्याने कुंपणाला धडकून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत हरणांच्या शरीराचे शवविच्छेदन करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.