सांगलीत वाघाच्या चार नख्या जप्त
By Admin | Updated: June 27, 2014 00:44 IST2014-06-27T00:44:31+5:302014-06-27T00:44:44+5:30
कोल्हापुरातून खरेदी : इस्लामपुरातील संशयित ताब्यात; गुन्ह्याची कबुली

सांगलीत वाघाच्या चार नख्या जप्त
सांगली : येथील कृष्णा नदीवरील माई घाटावर संशयितरित्या फिरणाऱ्या अल्पवयीन संशयितास शहर पोलिसांनी आज (गुरुवार) दुपारी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे वाघाच्या चार नख्या सापडल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत ८० हजार रुपये आहे. या नख्या कोल्हापूरनजीकच्या जोतिबा डोंगरावरून खरेदी केल्याची कबुली या संशयिताने दिली आहे.
पोलीस निरीक्षक राजू मोरे यांचे पथक माई घाटावर गस्त घालत होते. त्यावेळी हा संशयित हाती लागला. तो इस्लामपुरातील ताकारी रस्त्यावर राहतो. महिन्यापूर्वी त्याने कोल्हापूरनजीकच्या जोतिबा डोंगरावरून या नख्या खरेदी केल्या आहेत. याठिकाणी वाघाच्या नख्या विकल्या जातात, अशी माहिती संशयिताने पोलिसांना दिली आहे. प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे या चार नख्या खरेदी केल्या आहेत. गळ्यात ताईत म्हणून घालण्यासाठी या नख्यांचा उपयोग केला जातो. संशयिताविरुद्ध भारतीय वन्यजीव १९७२ चे कलम ३९, ५१ या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे निरीक्षक मोरे यांनी फिर्याद दिली आहे.
सांगलीत या नख्या घेऊन तो कशासाठी फिरत होता, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. तीन महिन्यांपूर्वी वाघाची कातडी विकणाऱ्या टोळीस अटक केली होती. आता वाघाच्या नख्या सापडल्याने खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)