नाशिकला निघालेले चाळीस प्रवासी एसटीसह तासभर वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:58+5:302021-07-28T04:27:58+5:30
सांगली : प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेतून मिरज आगाराची एसटी तासभर अडवून ठेवल्याचा प्रकार तासगाव स्थानकात घडला. यामुळे प्रवासी वेठीस धरले ...

नाशिकला निघालेले चाळीस प्रवासी एसटीसह तासभर वेठीस
सांगली : प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेतून मिरज आगाराची एसटी तासभर अडवून ठेवल्याचा प्रकार तासगाव स्थानकात घडला. यामुळे प्रवासी वेठीस धरले गेले. विभाग नियंत्रकांनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रवासी आणि एसटीची सुटका झाली.
या घडामोडींमध्ये चालक - वाहकावर अरेरावीचा प्रकारही घडला असून, याची चौकशी केली जाणार आहे. सांगली - मिरजेसह पूर्व भागातून पुण्याकडे जाणारी सर्व एसटी वाहतूक पुरामुळे सध्या तासगावमार्गे सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या गाड्या जाताना तासगावमधील प्रवासीही नेतात. यामुळे तासगाव आगाराच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यातूनच मंगळवारी दुपारी संघर्ष पेटला. अधिकारीच अरेरावीवर आले. मिरज आगाराची एसटी नाशिकला निघाली असता तासगावमध्ये काही प्रवासी चढले. हे दिसताच स्थानकातील अधिकाऱ्यांनी गाडी रोखून धरली. तासगावचे प्रवासी घेतल्याबद्दल आक्षेप घेतला. चालक - वाहकांसोबत वाद पेटला. सुमारे तासभर हा संघर्ष सुरू होता. एसटीतील प्रवासी वेठीस धरले गेले. चालक - वाहकांच्या अंगावर जाण्याचा प्रकारही घडला. त्यामुळे प्रवाशांनीही अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली.
चालक - वाहकांनी हा प्रकार मिरज आगार प्रमुखांना कळवला. त्यांच्या सुचनेनुसार विभागीय नियंत्रक अरुण वाघाटे यांना माहिती दिली. वाघाटे यांनी तासगावच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. एसटी अडवून धरल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर गाडी सोडण्यात आली. तासाभराच्या विलंबाने गाडी पुढे मार्गस्थ झाली. खासगी वडाप गाड्यांसोबत एसटीच्या अधिकाऱ्यांचा संघर्ष नेहमी चालतो. पण, खुद्द स्वत:च्या कर्मचाऱ्यांसोबतच हा प्रकार पाहून प्रवासी स्तिमित झाले.
कोट
प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेतून हा प्रकार घडला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद दिल्यानंतर गाडी सोडण्यात आली. तासभर गाडी व प्रवासी अडवून ठेवण्याचा प्रकार योग्य नव्हता.
- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभाग