माजी पदाधिकाऱ्यांनाही हवी पुन्हा संधी
By Admin | Updated: January 16, 2016 00:32 IST2016-01-15T23:10:24+5:302016-01-16T00:32:58+5:30
तासगावला अध्यक्षपद : जयंतरावांनी घेतल्या मुलाखती

माजी पदाधिकाऱ्यांनाही हवी पुन्हा संधी
सांगली : जिल्हा परिषदेतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी, नवीन पदाधिकारी निवडीतही संधी देण्याची मागणी शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे केली. तासगावातील अध्यक्षपदाच्या दावेदारांनी तालुका नेत्यांमार्फत शिफारशी केल्या. परंतु, नवीन चेहऱ्यांनाच संधी देण्याचा निर्णय झाला आहे. तासगावला अध्यक्षपद मिळणार असून सर्व अधिकार आमदार सुमनताई पाटील यांना दिले आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ३१ सदस्य आणि दोन सहयोगी सदस्यांची आमदार पाटील व जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी बैठक घेतली. नवीन निवडीबद्दल सर्वच सदस्यांची मते जाणून घेतली. तालुकानिहाय सर्व सदस्यांना एकत्रित बोलावण्यात आले होते. जत तालुक्यातील सहा सदस्यांनी, आपल्यापैकी कोणालाही संधी देण्याची मागणी केली. आटपाडी तालुक्यातून चार सदस्य निवडून येऊनही तेथे दोन सभापतीपदे दिली, त्यामुळे जतला पुन्हा एकदा पद देण्याची त्यांनी मागणी केली. आटपाडीतून कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा तानाजी पाटील व समाजकल्याण सभापती उज्ज्वला लांडगे यांनी पुन्हा दावेदारी केली. खानापूर तालुक्यातील माजी समाजकल्याण समिती सभापती किसन जानकर व लेंगरे गटाचे सदस्य फिरोज शेख यांनीही पद मागितले आहे. मिरज तालुक्यातून आप्पासाहेब हुळ्ळे, राजेंद्र माळी यांनी, नेते सांगतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले. भीमराव माने यांनी मात्र उपाध्यक्ष पदाची संधी देण्याची मागणी केली. त्यावर ‘पूर्वी उपाध्यक्षपद देतेवेळी का घेतले नाही?’, अशी विचारणा नेत्यांनी केली. वाळवा, शिराळा तालुक्यातील सर्वच सदस्यांनी जयंत पाटील घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले. तासगाव तालुक्यातील पाच सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले असून एक अपक्ष आहे.
येथील योजना शिंदे, कल्पना सावंत, शुभांगी पाटील, स्नेहल पाटील यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. तासगाव तालुक्यास अध्यक्षपद देण्याचे निश्चित असून तुम्ही एकत्रित निर्णय घेऊन काय ते सांगा. अध्यक्षपद निवडीचे सर्व अधिकार आ. सुमनताई पाटील यांना दिल्याचेही नेत्यांनी सांगितले. कवठेमहांकाळ तालुक्यातील सदस्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांचा एक विधानसभा मतदारसंघ असला तरी, कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र पद देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)
मूळच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय
राष्ट्रवादीच्या चिन्हावर सदस्य निवडून आले आहेत. यामुळे त्यांचे नेते कुठेही असले तरी, सदस्य आमचेच आहेत. पदाधिकारी बदलामध्ये कोणतीही ‘गंमत’ होणार नाही. मागील निवडीवेळी जे नेते राष्ट्रवादीबरोबर होते आणि सध्या ते अन्य पक्षात आहेत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर या नेत्यांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांची नावे चार दिवसात निश्चित करणार आहे, अशी माहिती विलासराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.