कडेगावच्या माजी नगराध्यक्षा नीता देसाई यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:59+5:302021-08-17T04:31:59+5:30
फोटो ओळ : कडेगाव येथे माजी नगराध्यक्षा नीता देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबद्दल त्यांचा आमदार अरुण ...

कडेगावच्या माजी नगराध्यक्षा नीता देसाई यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
फोटो ओळ : कडेगाव येथे माजी नगराध्यक्षा नीता देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबद्दल त्यांचा आमदार अरुण लाड यांनी सत्कार केला. यावेळी जगदीश महाडिक, वैभव पवार उपस्थित होते.
कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी नगराध्यक्षा नीता देसाई यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठी हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मंत्री जयंत पाटील यांच्या धक्का तंत्राचा सूचक इशाराच असल्याची चर्चा आहे.
कडेगाव नगरपंचायतीत सध्या विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आहे. कडेगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी स्वतः प्रचार यंत्रणेकडे लक्ष घातले होते. त्यावेळी काँग्रेसने १७ पैकी १० तर भाजपने ७ जागांवर विजय मिळविला होता. त्यावेळी ओबीसी महिला प्रवर्गातून विजयी झालेल्या आकांक्षा जाधव यांना अडीच वर्षे नगराध्यक्षपदी संधी मिळाली होती. यानंतर सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने नीता देसाई यांना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिली.
देसाई यांना अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत नगराध्यक्षपदी कायम ठेवावे अशी त्यांची आणि काही कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे नीता देसाई व त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते.
कडेगाव येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार अरुण लाड व जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, कडेगाव तालुका अध्यक्ष जयदीप यादव यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्षा नीता संदीप देसाई यांच्यासह कडेगावचे माजी सरपंच माधवराव देशमुख, माजी उपसरपंच रंगराव देशमुख, संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष संदीप काटकर, गोसावी समाज तालुका अध्यक्ष किरण चव्हाण, बेलदार समाजाचे तालुका अध्यक्ष संभाजी चव्हाण, माजी पोलीस अधिकारी अनंत देशमुख, नाथा गुरव, दादासो बेल्लम, विजय माळी, अमोल महाडिक, सुनील कवळे, गणेश दोडके, विकी पवार, रोहित शिंदे, रवी चव्हाण, दीपक चव्हाण, सागर चव्हाण, अमित चव्हाण, सुनील चव्हाण, दशरथ चव्हाण, प्रेम चव्हाण, मोहन जाधव आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
चौकट :
राष्ट्रवादीकडून पॅनलची तयारी?
कडेगाव नगरपंचायतच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत. आता मात्र आगामी निवडणुकीत पॅनल उभा करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी सुरू आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजप या परंपरागत परस्परविरोधी गटांनीही मोर्चेबांधणीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यातच नीता देसाई आणि कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेशाने शहरातील राजकारण तापले आहे.