माजी संचालकांवर लवकरच आरोपपत्र
By Admin | Updated: May 16, 2015 00:02 IST2015-05-15T23:59:49+5:302015-05-16T00:02:35+5:30
जिल्हा बँक घोटाळा : ३८ संस्थांना नियमबाह्य १५७ कोटींचा लाभ; १०४ जणांनी मांडले म्हणणे

माजी संचालकांवर लवकरच आरोपपत्र
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जाचा आणि कर्ज परतफेडीचा ३८ संस्थांना १५७ कोटींचा नियमबाह्य लाभ देऊन बँकेचे नुकसान केल्याप्रकरणी माजी संचालक, तत्कालीन अधिकारी आदी १०४ जणांनी शुक्रवारी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे मांडले. सहकार संस्था अधिनियम १९६० कलम ७२ (२) ची अंतिम चौकशी पूर्ण झाली असून, उर्वरितांना २५ मेपर्यंत लेखी म्हणणे सादर करण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे.
जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक, अध्यक्ष, माजी कार्यकारी संचालक यांनी नियमबाह्य, विनातारण व मर्यादा ओलांडून २१ संस्थांना कर्जवाटप केले होते. याचबरोबर १७ संस्थांना दिलेल्या कर्ज येणेबाकीतील सूट यामुळे जिल्हा बँकेस १५७ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८३ च्या चौकशीत ठेवला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार दोषींवर जबाबदारी निश्चितीसाठी चौकशी सुरु आहे. माजी संचालक, तत्कालीन कार्यकारी संचालक व मृत माजी संचालकांच्या वारसांसह एकूण १०२ जणांना खुलासे, म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस बजावलेली आहे. त्यांचे खुलासे सादर झालेले आहेत.
दरम्यान, ३८ संस्थांच्या कर्जप्रकरणी १५७ कोटीच्या नुकसानीवरून माजी संचालकांना सरसकटपणे नुकसानीबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्याला माजी संचालकांतर्फे वकिलांनी आक्षेप घेतला होता. कर्जप्रकरणांची छाननी करावी, ज्या प्रकरणाशी ज्याचा सहभाग आहे, अथवा मंजुरीच्या सभेला जे उपस्थित आहेत, त्यांनाच नोटीस देणे आवश्यक आहे, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून छाननी करून माजी संचालकांना फेरनोटिसा काढल्या. त्यावर शुक्रवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत चौकशी अधिकारी तथा कऱ्हाडचे उपनिबंधक (सहकारी संस्था) संपतराव गुंजाळ यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी संबंधित माजी संचालक, तत्कालीन अधिकारी यांचे म्हणणे ऐकूण घेतले आणि खुलासेही स्वीकारले आहेत. यावेळी बँकेला १५७ कोटींचे नुकसान करण्यामध्ये काही माजी संचालक आणि तत्कालीन अधिकाऱ्यांचा समावेश नसल्यामुळे त्यांना वगळल्याची खात्रीशीर माहिती आहे. पण, यातून नक्की कुणाला वगळले, याची ठोस माहिती चौकशी अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही.
या चौकशीनंतर आता सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७२ (३) नुसार दोषी माजी संचालक, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात येणार असल्याचे चौकशी अधिकारी गुंजाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
...तर संचालक पदाला मुकावे लागणार
बँकेचे १५७ कोटींचे नुकसान केल्याप्रकरणात काही विद्यमान संचालक दोषी दिसत आहेत. या संचालकांवर दोषारोपपत्र निश्चित झाल्यास त्यांना पदाला मुकावे लागणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.
काही संचालक मृत झाले असून त्यांच्या वारसांना बाजू मांडण्याची नोटीस बजाविली होती. परंतु, त्यांच्याकडून वेळेत खुलासे सादर झाले नाहीत. म्हणून त्यांच्या वारसांना २५ मेपर्यंत खुलासे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. या कालावधित त्यांनी खुलासे सादर न केल्यास वारसांच्या मालमत्तेवर बोजा चढवून रक्कम वसुली होणार आहे. यामुळे वारसांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.